येलवडी (जिल्हा पुणे) – वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हालहाल करून मारले. दुसर्या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. ‘हिंदूंनी तो साजरा करू नये’, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता. वस्तूतः महाराजांच्या हत्येचा गुढीपाडव्याच्या दिवशी उभारल्या जाणार्या गुढीशी काहीच संबंध नाही. महाराजांच्या हत्येच्या आधी अनेक युगांपासून गुढी उभारण्याचे आणि गुढीपाडवा सण साजरा करायचे शास्त्र आहे. संभाजी महाराजांनी मरण पत्करले; पण त्यांनी धर्मांतर केले नाही. आपल्यानंतर आपली प्रजा धर्मांतरित होऊ नये; म्हणून त्यांनी हे बलीदान दिले; परंतु आज आपले हिंदु बांधव आमिषांना, भूलथापांना बळी पडून धर्मांतरित होत आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे यांनी केले. येलवडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमासाच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या व्याख्यानाला गावकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसेच गुढी उभारावी कि नाही, हा संभ्रमही त्यांच्या मनातून दूर झाला.
या वेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तीर्थक्षेत्र अखिल येलवडी गावाचे ग्रामस्थ, तसेच माजी सरपंच श्रीमती हिराबाई बोत्रे, उद्योजक श्री. जीवन भाऊ बोत्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गाडे, सागर काळडोके, जय गाडे, राहूल गाडे आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच तरुण वर्ग आणि महिलांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती. गावाचे उपसरपंच बंटी (आण्णा) बोत्रे यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे यांचा सत्कार करण्यात आला. या व्याख्यानाचा लाभ १५० हून अधिक धर्माभिमान्यांनी घेतला. या व्याख्यानामध्ये वारकरी संप्रदाय, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांनी सहभाग घेतला होता. ऋषिकेश बोत्रे यांनी ध्येयमंत्र घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
क्षणचित्रे :
१. व्याख्यानानंतर धर्माभिमान्यांनी धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद, हिंदु-राष्ट्र आक्षेप आणि खंडण अशा सनातनच्या ग्रंथांची मागणी दिली.
२. धर्माभिमानी श्री. जीवनभाऊ बोत्रे यांनी समाजात वितरण करण्यासाठी स्वतःहून ५० ग्रंथांची मागणी केली, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची व्यवस्था लवकरात लवकर चालू करावी, अशी विनंती केली.
३. मंडळातील कार्यकर्त्यांनी धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली, तरुणांनी स्वसंरक्षण प्रशिक्षवर्गाची मागणी केली.