अध्यक्ष आणि उपसभापती यांच्या अधिकारांवरून विधान परिषदेत विवाद !
मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – विधीमंडळात होणार्या कार्यक्रमाविषयी मला कल्पना दिली जात नाही. कार्यक्रमाविषयी अधिकार्यांकडून माहिती मिळते. मी केवळ सभागृहापुरती उपसभापती आहे का ? अशी खंत उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी विधान परिषदेत उपस्थित केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आयोजित संगीत रजनी कार्यक्रमाविषयी उपसभापतींना माहिती देण्यात न आल्याचे सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात उपस्थित केले. या वेळी ‘विरोधी पक्षातील आमदारांनी उपसभापतींचे अधिकार डावलण्यात येत आहेत का ?’ याविषयी प्रश्न उपस्थित केले.
या वेळी स्वत: उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी त्यांना निर्णयप्रक्रियेपासून डावलण्यात येत असल्याचे प्रसंग सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार कपिल पाटील यांनी सभापतींचे पद रिक्त असतांना त्यांचे अधिकार उपसभापतींचे असल्याचे नमूद करत हे अधिकार मिळायला हवेत, अशी मागणी केली. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अध्यक्ष श्रेष्ठ कि सभापती ? याविषयी सभागृहात चर्चा करणे योग्य नाही. कामकाजात सरळता, सहजता आणि सुलभता यावी, यांसाठी नियमांमध्ये आवश्यक ते पालट करण्यात यावेत, असे म्हटले.