महाराष्‍ट्रात साकव बांधण्‍यासाठी केंद्र सरकारकडे १ सहस्र ६०० कोटी रुपये निधीची मागणी ! – रवींद्र चव्‍हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

साकव (छोटे लाकडी पूल)

मुंबई – कोकणसह राज्‍यातील ओढे, नाले यांवर असलेल्‍या साकवांच्‍या (छोटे लाकडी पूल) ठिकाणी काँक्रिटीकरणाच्‍या माध्‍यमातून नव्‍याने छोटे-छोटे पूल बांधण्‍यासाठी आणि साकवांच्‍या दुरुस्‍तीसाठी केंद्र सरकारच्‍या ‘सेंट्रल रिझर्व्‍ह फंड’ (सी.आर्.एफ्.) मधून १ सहस्र ६०० कोटी रुपये निधी उपलब्‍ध होण्‍यासाठी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांच्‍या माध्‍यमातून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्‍याकडे विनंती करण्‍यात आली आहे. हा निधी उपलब्‍ध झाल्‍यानंतर कोकणासह राज्‍यात छोटे-छोटे पूल लवकरात लवकर बांधण्‍यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्‍हाण यांनी १६ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्‍या घंट्यांत दिले. विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्‍या घंट्यांत आमदार राजन साळवी यांनी कोकणातील साकवांविषयीचा प्रश्‍न उपस्‍थित करत साकवांची सद्य:स्‍थिती सभागृहाच्‍या निदर्शनास आणून दिली.