संबंधित शेतकर्यांवर होणार कारवाई
रत्नागिरी – ‘प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यभरासह जिल्ह्यातही राबवण्यात येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात बनावट फळपीक विम्यासंदर्भात कार्यवाही होत असतांना आता रत्नागिरी जिल्ह्यातही बनावट फळपीक विम्याचे लोण येऊन पोचले आहे. जिल्ह्यात तब्बल १० बनावट फळपीक विम्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या १० शेतकर्यांनी ज्या पिकासाठी विमा काढला होता, ते पीकच या शेतकर्यांकडे आढळून आलेले नाही, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
कृषी क्षेत्राच्या उत्पादनात फळपिकांचा महत्त्वाचा वाटा असतो. अशा वेळी फळपिकांना हवामानापासून होणार्या धोक्यासाठी विम्याचे संरक्षण देऊन शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची असते.
जिल्ह्यात ९ सहस्र ४९६ शेतकर्यांचे सर्वेक्षण पूर्ण
जिल्ह्यात २०२२-२३ वर्षातील या योजनेचे लाभार्थी ३२ सहस्र ४०० आहेत, त्या लाभार्थ्यांपैकी ९ सहस्र ४९६ जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यातील २० जणांच्या दिलेल्या माहितीत सामान्य त्रुटी आहेत; मात्र १० शेतकरी असे आहेत, ज्यांनी आंबा पिकासाठी विमा उतरवला होता; मात्र हे पीकच या शेतकर्यांकडे सर्वेक्षणादरम्यान आढळून आले नाही. आता या १० शेतकर्यांवर शासनाकडून कारवाई करण्यात येणार असून त्यांनी भरलेला हप्ताही जप्त केला जाणार आहे.
जिल्ह्यात अधिकाधिक तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. शिवाय जे बोगस शेतकरी आढळले आहेत, त्यांच्यावर शासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तंत्र कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी दिली.
संपादकीय भुमिकाबनावट फळपीक विम्याचे प्रकरण रत्नागिरी जिल्ह्यात उघड होणे चिंताजनक ! |