संत एकनाथ महाराजांच्या अभंगातून गुरुकृपेने साधनेविषयी शिकायला मिळालेली प्रेरणादायी सूत्रे

१३.३.२०२३ या दिवशी संत एकनाथ महाराज यांची पुण्यतिथी (एकनाथ षष्ठी) आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

‘संत एकनाथ महाराज हे उच्च कोटीचे संत होते. प्रत्यक्ष भगवंताने त्यांच्या घरी ‘श्रीखंड्या’ बनून सेवा केली. अशा संत एकनाथ महाराज यांनी रचलेला पुढील अभंग परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्या साधनेच्या दृष्टीने मला अत्यंत लाभदायक झाला आहे.

१. संत एकनाथ महाराज यांचा अभंग आणि त्याचा मला जाणवलेला भावार्थ

पू. शिवाजी वटकर

आवडीनें भावें हरिनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।। १ ।।

भावार्थ : मी भगवंताचे (गुरुकृपायोगानुसार सांगितलेले) नाम आवडीने आणि भावपूर्ण घेतल्यास तोच माझी चिंता मिटवणार आहे.

नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा ।
पति तो लक्ष्मीचा जाणतसे ।। २ ।।

भावार्थ : साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्याविषयी सर्वकाही जाणत आहेत. त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीचे दुःख करायचे नाही.

सकळ जिवांचा करितो सांभाळ ।
तुज मोकलील ऐसें नाही ।। ३ ।।

भावार्थ : भगवंत सर्व जिवांचा सांभाळ करत आहे; मग तो माझ्याकडे कसे बरे दुर्लक्ष करील ! ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ब्रह्मांडनायक आहेत; म्हणून ते माझा सांभाळ करून माझ्याकडून साधना करून घेणारच आहेत’, याची मला निश्चिती आहे.

जैसी स्थिति आहे तैशापरी राहें ।
कौतुक तूं पाहें संचिताचें ।। ४ ।।

भावार्थ : ‘परिस्थिती स्वीकारणे, ही श्रेष्ठ प्रतीची साधना आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे; म्हणून माझ्या जीवनात जे काही होते, ते माझ्या संचितानुसार होत असल्याने मला परिस्थिती स्वीकारायलाच हवी. त्यामुळेच माझी साधना होणार आहे.

एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपें त्याचा नाश झाला ।। ५ ।।

भावार्थ : कितीही घोर प्रारब्ध असले, तरी ते गुरुकृपेने नष्ट होणार आहे. ‘साधकाच्या जीवनात ९९ टक्के प्रारब्ध असले, तरी साधकाला त्यावर ‘साधना आणि गुरुकृपा’ यांच्या बळावर मात करता येते’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगून साधकांना आश्वस्त केले आहे.

२. संत एकनाथ महाराज यांच्या अभंगाविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

२ अ. मागील ३२ वर्षांपासून जवळजवळ प्रत्येक दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांनी रचलेली आणि गायलेली प्रासादिक भजने मी ऐकतो किंवा त्यांचे मला स्मरण होते. तसेच प.पू. भक्तराज महाराज यांनी परावाणीत गायलेला संत एकनाथ महाराजांचा वरील अभंग अद्वितीय, अवीट आणि आकाशतत्त्वाची अनुभूती देणारा आहे’, असे मला वाटते.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी म्हटले आहे, ‘‘नाम, सत्संग आणि सत्सेवा यांपेक्षा परिस्थिती स्वीकारणे ही श्रेष्ठ प्रतीची साधना आहे.’’ हे मला या अभंगातून शिकायला मिळाले. त्यामुळे मी माझा सर्व भार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सोपवला आहे. त्यांच्याच कृपेने मला निश्चिंत राहून आनंदाने आजन्म साधना करता येईल.

साधना करणे आणि आध्यात्मिक जीवन जगणे यांचे महत्त्व सांगणारे संत एकनाथ महाराज अन् त्यानुसार माझ्याकडून कृती करून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.१२.२०२२)