सनातनच्या रामनाथी आश्रमात साजरे होणारे साधकांचे वाढदिवस म्हणजे त्या दिवशी साधकांना गुरुदेवांनी दिलेली जणू भावमय भेट !

कु. रूपाली कुलकर्णी

‘सनातनच्या रामनाथी आश्रमात काही साधक काही दिवस रहाण्यासाठी येतात किंवा बरेच साधक अनेक वर्षांपासून आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करत आहेत. प्रत्येकाला स्वतःचा वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस असतो. रामनाथी आश्रमात म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या हिंदु राष्ट्रात तो कसा साजरा होईल?’, याची उत्सुकता काही साधकांना नक्कीच वाटत असेल ! 

१. जन्मतिथीनुसार वाढदिवस साजरा करणे

साधक आठवणीने प्रत्येक साधकाचा वाढदिवस त्याच्या जन्मतिथीनुसार साजरा करतात.

२. आश्रमात आल्यावर साजर्‍या करण्यात येणार्‍या वाढदिवसाचे स्वरूप

घरून आश्रमात आल्यावर पहिल्या वर्षीचा वाढदिवस हा त्या साधकासाठी गुरूंच्या घरी आल्यावरचा (आश्रमातील) प्रथम वाढदिवस असतो. त्या दिवशी त्या साधकाचे नाव भोजनकक्षातील फलकावर लिहून त्याच्यासाठी शुभेच्छा लिहिलेल्या असतात. आश्रमातील फलकावर त्या साधकाचे नाव लिहिल्याने आश्रमातील सर्वांनाच त्या साधकाचा वाढदिवस असल्याचे कळते. त्यामुळे आश्रमातील सर्व जण त्याला शुभेच्छा देतात. या शुभेच्छांच्या माध्यमातून त्या साधकावर आनंदाची उधळण होते. दुपारी महाप्रसादाच्या वेळी (जेवणाच्या वेळी) वाढदिवस असलेला साधक, त्याचे मित्र साधक, नातेवाइक आणि इतर साधक एकत्र जमतात. एक सुवािसनी साधिका वाढदिवस असणार्‍या साधकाला ओवाळते आणि त्यानंतर सर्वांच्या वतीने शुभेच्छापत्र देते. जेवणात त्याला गोड पदार्थ देतात.

वर उल्लेख केल्याप्रमाणे सर्व साधकांचे वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरे केले जात होते; परंतु आपत्काळाची गती ओळखून अशा पद्धतीने पहिल्या वर्षी वाढदिवस साजरा केला जातो. नंतरच्या वर्षी साधकांचा वाढदिवस तो सेवा करत असलेल्या ठिकाणी साजरा केला जातो. त्या दिवशी ज्या साधकाचा वाढदिवस आहे, तो साधक नवीन पोशाख घालतो आणि सहसाधकही नवीन पोशाख घालून त्याच्या आनंदात सहभागी होतात. साधकाच्या वाढदिवसाच्या वेळी त्याचे नातेवाइक, मित्र- मैत्रिणींनाही आवर्जून बोलावतात. त्या साधकाला शुभेच्छापत्र आणि गोड खाऊ देतात. त्यानंतर त्या साधकाला त्याचे ध्येय विचारले जाते. साधकही ‘स्वतःत साधनेच्या दृष्टीने स्वतःमध्ये काय अल्प आहे ? आणि मी काय प्रयत्न करणार ?’, ते अगदी प्रांजळपणे सांगतात. त्या साधकाला दिलेले शुभेच्छापत्र नंतर आश्रमातील फलकासमोर सर्वांना बघण्यासाठी ठेवले जाते. अशा रितीने प्रेम आणि भाव यांची म्हणजे प्रेमभावाची देवाण- घेवाण होते. असे साधकांच्या माध्यमातून गुरूंनी दिलेले प्रेम अविस्मरणीय ठरते.

३. शुभेच्छापत्रांचे वैशिष्ट्य

साधक किंवा अन्यही जण वाढदिवस असलेल्या साधकाला शुभेच्छापत्र देतात. त्यामध्ये त्याच्याविषयी सांगितलेले गुण किंवा साधकाने करावयाचे प्रयत्न हे कधी पद्यात, तर कधी भावपूर्ण शब्दांत मांडलेले असतात. ते वाचून सर्वांचाच भाव जागृत होतो. आश्रमातील बालसाधकही सुंदर कविता लिहितात. याविषयीही आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शुभेच्छापत्र कमीत कमी १५ मिनिटांत बनवायचे असते, म्हणजे सेवेसाठी अधिकाधिक वेळ देता येतो.

असा आध्यात्मिक स्तरावरील वाढदिवस साजरा करून प्रेमभावाने सर्व साधकांना एकमेकांशी जोडून ठेवणार्‍या आणि त्यांच्या समष्टी रूपातील गुरुतत्त्वाला अनुभवायला देणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या चरणी सर्व साधकांच्या वतीने कोटी कोटी कृतज्ञता !’

– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (१७.३.२०२२)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक