पुणे – स्वतःच्या मालकीच्या घरात रहात असल्यास पुणे महानगरपालिकेच्या वतीने घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. राज्यशासनाने वर्ष २०१९ मध्ये महानगरपालिकेचा ठराव विखंडन करून घरपट्टीमध्ये देत असलेली ४० टक्के सवलत रहित करण्याविषयी निर्देश दिले होते. सदर निर्देश रहित करून पुणे महापालिका परिसरात मिळकत करात पुणेकरांना यापूर्वी देण्यात येणारी ४० टक्के सवलत पुन्हा चालू करण्यात यावी, अशी मागणी पुणेकरांनी केली आहे. ही मागणी लक्षात घेता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून याविषयी राज्यशासन सकारात्मक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ८ मार्च या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन दिले. हा प्रश्न सोडवण्याविषयी राज्यशासन सकारात्मक असून हा निर्णय अंतिम झाल्यानंतर पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.