राज्यात श्वान दत्तक योजना चालू करणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, पशूसंवर्धन मंत्री  

महाराष्ट्रात १२ लाख भटक्या कुत्र्यांचा वावर !

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रातील विविध शहरे आणि ग्रामीण भाग येथे एकूण १२ लाख भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. या भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक शहरांत भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणांत वाहनधारकांचा अपघात होऊन काही लोक घायाळ झाले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे. श्वानांचे संगोपन करण्यासाठी राज्यात ‘श्वान दत्तक योजना’ चालू करणार आहे, अशी माहिती पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली. सदस्य प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर आणि सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्यांविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, प्राणीप्रेमी किंवा पशू दत्तक घेऊ इच्छिणार्‍या व्यक्तीला दत्तक योजनेच्या माध्यमातून श्वान दत्तक दिले जाईल. याविषयी विहीत धोरण ठरवण्यासाठी समिती गठित करण्यात येईल. या विषयाच्या संदर्भात काम करणार्‍या सामाजिक संस्थांनाही समितीत सहभाग करून घेण्यात येईल, तसेच ही योजना राबवण्याविषयी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांचे दायित्व निश्चित करण्यात येईल.