खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

चौकशी करून ८ मार्च या दिवशी निर्णय देण्याची अध्यक्षांची घोषणा !

मुंबई, १ मार्च (वार्ता.) – विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याविषयी भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत केलेल्या हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. याविषयी २ दिवसांत चौकशी करून ८ मार्च या दिवशी सभागृहात निर्णय देऊ, अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. अध्यक्षांच्या निर्णयानंतरही सत्ताधारी पक्षांची संजय राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्वरित निर्णय देण्याची मागणी केली. या वेळी सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

दिवसांत चौकशी करून निर्णय देऊ – अध्यक्ष राहुल नार्वेकर

१. या वेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात तीव्र भावना व्यक्त केल्या. या वेळी विरोधी पक्षाकडून नाना पटोले यांनी हा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना असून सभागृहाचा वेळ वाया न दवडता अध्यक्षांनी निर्णय घेण्याची मागणी केली.

२. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी या वेळी चहापानाला गेले नाहीत; म्हणून विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘राष्ट्रद्रोही’ म्हटल्याचे सूत्र उपस्थित करून त्याविषयी कोणती कारवाई करणार ? असा प्रश्न उपस्थित केला.

३. या वेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अतुल भातखळकर यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव वाचून दाखवला. यामध्ये ‘संजय राऊत यांचे वक्तव्य विधीमंडळाच्या सर्व लोकप्रतिनिधींसाठी अपमानास्पद आहे. विधीमंडळाच्या उज्जवल परंपरेला पायदळी तुडवणारी आहे. यामुळे राज्यघटनेचा अपमान झाला आहे. हा सर्व विधीमंडळासह समस्त जनतेचा अपमान आहे. यामुळे याचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे’, अशी मागणी केली असल्याचे सांगितले.

४. सभागृहात बोलतांना अतुल भातखळकर यांनी काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एका महिलेला दूरभाषवरून शिव्या दिल्या होत्या. जो स्वत: आर्थिक गुन्ह्यातील आरोपी आहे, तो आरोपी महाराष्ट्राच्या विधीमंडळाला चोर म्हणत आहे. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्हाला चोर म्हणणारे संजय राऊत आमच्याच मतांवर निवडून आले असल्याची भावना व्यक्त करून कठोर कारवाईची मागणी केली.

या वेळी मंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आणि नीतेश राणे यांनीही त्यांच्या भावना सभागृहात व्यक्त केल्या.