संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांचा गदारोळ !

विधान परिषदेतून…

  • खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ संबोधल्याचे विधीमंडळात पडसाद !

  • विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

खासदार संजय राऊत : ‘विधीमंडळ नाही हे चोरमंडळ आहे.’

मुंबई, १ मार्च (वार्ता.) – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलतांना विधीमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. ही बनावट शिवसेना (शिंदे गटाची) आहे. बनावट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे विधानसभा आणि विधान परिषद येथे तीव्र पडसाद उमटले. संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रविष्ट करून त्यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी सत्ताधार्‍यांनी करून सभागृहात गदारोळ घातला. त्यामुळे प्रथम १० मिनिटे, नंतर २५ मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले. कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर सत्ताधार्‍यांनी गदारोळ चालूच ठेवल्यामुळे उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

  (सौजन्य : ABP MAJHA)

भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाविषयी केलेले वक्तव्य गंभीर आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करून त्यांना अटक केलीच पाहिजे. भाजपचे आमदार राम शिंदे म्हणाले की, यापूर्वी संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव प्रविष्ट करण्यात आला आहे. त्याची कार्यवाही करावी.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, संजय राऊत यांच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करत नाही; मात्र त्यांनी कोणत्या परिस्थितीत असे वक्तव्य केले, ते पडताळले पाहिजे. सत्ताधारी विरोधी पक्षातील आमदारांना ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणतात, तर मुख्यमंत्री ‘देशद्रोही’ म्हणतात. मग असे म्हणणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे. आमदार एकनाथ खडसे यांनीही असेच मत व्यक्त केले.

 (सौजन्य : ABP MAJHA)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत विधीमंडळाला ‘चोर’ म्हणत असतील, तर आम्ही येथे काम न करता घरी गेलेले बरे. तेही राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांना असे बोलण्याचा अधिकार नाही. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विधीमंडळाचे सदस्य आहेत. मग आमच्यासह तेही चोर ठरतात का ? आम्ही काय गुंड आहोत का ? कुणीही ‘महाराष्ट्रद्रोही आणि देशद्रोही’ म्हणून भूमिका मांडू नये. देशात महाराष्ट्राचे विधीमंडळ सर्वाेत्तम मानले जाते. त्यामुळे विधीमंडळाचा असा अवमान असून ते सहन केले जाणार नाही. उद्या समाजात असे अनेक संजय राऊत सिद्ध होऊन विधीमंडळाचा अवमान करतील. विधानमंडळाला ‘चोर’ म्हणण्याचा अधिकार दिला, तर कुणाचाही विधान मंडळावर विश्वास रहाणार नाही. विधान मंडळावर कुणी बोलू नये, यासाठी हक्कभंगाची व्यवस्था केलेली आहे. राऊत यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. आमच्या पक्षातील सदस्याने असे वक्तव्य केले असते, तर तेही आम्ही खपवून घेतले नसते. उपसभापतींनी त्यांच्या अधिकारातून कारवाईविषयी निर्णय घ्यावा.

 (सौजन्य : ABP MAJHA)

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या की, सत्ताधारी आमदारांनी मागणी केल्यानंतर लगेच हक्कभंग प्रविष्ट करता येत नाही. हा हक्कभंग पडताळून घ्यावा लागतो. सत्ताधारी आमदार सांगतात त्याप्रमाणे मला राऊत यांना अटक करावी, असे सांगण्याचा अधिकार नाही. तसे मी निर्देशही देणार नाही. तो अधिकार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आहे. समजा मला इतरांना अटक करण्याविषयी अधिकार दिले, तर मी माझ्या पद्धतीने त्या अधिकारांचा वापर करीन.

विधान परिषदेत सत्ताधारी आमदार आणि उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे बोलत असतांना सत्ताधारी आमदार उपसभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊन गोंधळ घालत होते. ‘न्याय द्या न्याय द्या, सभापती न्याय द्या, संजय राऊत यांना अटक झालीच पाहिजे’, अशा घोषणा सत्ताधारी आमदारांनी देऊन सभागृह दणाणून सोडले.

संजय राऊत यांचे विधान !

संजय राऊत सत्ताधार्‍यांविषयी म्हणाले, ‘‘ही बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नव्हे, हे चोरमंडळ आहे. त्यांनी पदावरून काढले, तरी आम्ही पक्ष सोडणार आहोत का ? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाही. पदे गेली तर पुन्हा येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे.’’