अमृतसरमध्ये सहस्रो सशस्त्र खलिस्तान समर्थकांकडून पोलीस ठाण्याला घेराव !

  • ‘वारीस पंजाब दे’ या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंह याच्या साथीदाराच्या सुटकेची मागणी !

  • खलिस्तानवाद्यांकडे बंदुका, तलवारी आणि काठ्या !

  • पोलिसांची हतबलता !

अमृतपालसिंह याच्या साथीदाराच्या सुटकेसाठी पोलिस ठाण्याला घेराव

अमृतसर (पंजाब) – अजनाला येथे ‘वारीस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंह याचा साथीदार तुफान सिंह याला अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ त्याच्या सहस्रो समर्थकांनी येथील पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. त्यांच्या हातात बंदुका, तलवारी आणि काठ्या होत्या. या वेळी पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स (तात्पुरते अडथळे) लावले होते. ते तोडून खलिस्तान समर्थक पोलीस ठाण्याच्या आवारात पोचले. ते ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत होते. या वेळी अमृतपालसिंह पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने गुन्हा रहित करण्याची मागणी केली. ‘जोपर्यंत गुन्हा रहित होणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही’, अशी घोषणा त्याने केली. या समर्थकांनी येथे गुरुग्रंथसाहिबची पालखी आणली असून त्यांनी येथे ठिय्या मांडून भजन म्हणण्यास चालू केले आहे.

अमृतपालच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून टीका करणार्‍या तरुणाचे अपहरण केल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी अमृतपालसह ३० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच प्रकरणात पोलिसांनी तुफान सिंह याला अटक केली. यामुळे अमृतपाल संतप्त झाला. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली होती.

निष्क्रीय पोलीस !

अमृतपाल याने २ दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचे घोषित केले होते; तरीही पंजाब पोलिसांनी याकडे गांभीर्याने न पाहिल्याने अमृतपालचे समर्थक सहस्रोच्या संख्येने येथे पोचले. सध्या येथे तणावाची स्थिती असून पोलिसांनी मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवला आहे. अमृतपाल याने या वेळी अजनाला येथे पोलीस अधीक्षक सतींदर सिंह यांच्याशी चर्चा केली. त्याने तुफान सिंह याला सोडण्यासाठी पोलिसांना १ घंट्याचा अवधी दिला होता.

संपादकीय भूमिका

पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांची वळवळ कशी वाढत आहे ?, हेच यावरून दिसून येते. तरीही राज्य आणि केंद्र सरकार याकडे तितक्या गांभीर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असेच चित्र आहे. ‘मागील इतिहास पहाता एखादी मोठी घटना घडल्यानंतरच सरकार जागे होणार आहे का ?’ असा प्रश्‍नही उपस्थित होतो !