मोनू मानेसर याला अटक केली, तर संपूर्ण गावाला अटक करावी लागेल !

२ मुसलमानांना जिवंत जाळल्याचे प्रकरण

मानेसर (हरियाणा) येथील हिंदु महापंचायतीची राजस्थान पोलिसांना चेतावणी !

मानेसर (हरियाणा) – राजस्थानच्या भिवानी येथे जुनैद आणि नासीर यांना चारचाकीमध्ये जिवंत जाळून ठार मारल्याच्या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी गोरक्षक मोनू मानेसर अन् त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे; मात्र मोनू याने त्याचा या हत्येत कोणताही सहभाग नसल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मानेसर येथे हिंदु महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. या वेळी पोलिसांना चेतावणी देण्यात आली, ‘जर राजस्थान पोलिसांनी मोनू मानेसर याला अटक करण्यासाठी येथे धाड टाकली, तर ते स्वतःच्या पायाने परत जाऊ शकणार नाहीत. मोनू याला अटक केली, तर संपूर्ण गावकर्‍यांना अटक करावी लागेल. मोनू मानेसर नसता, तर हे गाव छोटे पाकिस्तान झाले असते.’