एन्.आय.ए.च्या देशभरात गुंडांच्या ७२ ठिकाणांवर धाडी !

आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा झाल्याचे प्रकरण

नवी देहली – आतंकवाद्याकडून पैसे घेतल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) ७ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश येथील बवाना अन् लॉरेन्स बिश्नोई या टोळ्यांच्या ७२ ठिकाणांवर धाडी घातल्या. पंजाब, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात ही राज्ये आणि चंडीगड या केंद्रशासित प्रदेशात या धाडी घालण्यात आल्या. राजस्थानमध्ये घातलेल्या धाडीतून या टोळ्यांतील गुंडांचा पाकिस्तानमधील लोकांशी संपर्क असल्याचे उघड झाले.

१. एन्.आय.ए.ला लॉरेन्स बिश्नोई आणि बवाना टोळ्यांच्या लोकांचे पाकिस्तान अन् आय.एस्.आय्. यांच्याशी संबंध आढळले आहेत. या अंतर्गत आतापर्यंत ज्या गुंडांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्या चौकशीच्या आधारे ही सर्व माहिती मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्या गुंडांनी सांगितले की, बिश्नोई आणि बवाना टोळ्यांना पाकिस्तानमधून निधी मिळतो, ज्याचा वापर देशविरोधी कारवाया करण्यासाठी केला जात आहे.

२. प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येच्या प्रकरणी अटकेत असलेले गुंड लॉरेन्स आणि नीरज बवाना यांनी चौकशीमध्ये शस्त्र पुरवठादार टोळी आणि आतंकवादी यांच्याकडून अर्थपुरवठा होत असल्याची स्वीकृती दिली होती. एन्.आय.ए.ला या धाडींमध्ये काही ठिकाणी शस्त्रे सापडल्याचे सांगितले जात आहे.

३. एन्.आय.ए.ने घातलेल्या धाडीमध्ये कॅनडामध्ये बसून पंजाबमध्ये दहशत पसरवणार्‍या लखबीर लंडा आणि गुंड लॉरेन्स अन् गोल्डी बरार यांच्या जवळच्या साथीदारांच्या ठिकाणांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी लखबीर लंडा याला एन्.आय.ए.ने आतंकवादी घोषित केले असून त्याच्या जवळच्या नातेवाइकांवर सतत लक्ष ठेवण्यात येत होते. एन्.आय.ए.ने त्यांच्या ठिकाणांवरच धाडी टाकल्या आहेत.

संपादकीय भूमिका

पाककडून पैसे घेऊन भारतात गुन्हेगारी कृत्य करणार्‍या अशा गुंडांवर जलद गतीने खटला चालवून त्यांना फाशी होण्यासाठीच प्रयत्न करणे आवश्यक !