‘नेत्रशल्य तज्ञ पदव्युत्तर (एम्.एस्. ऑपथॅल्मोलॉजी (M.S. Opthalmology)) अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असतांना गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला आलेल्या अनुभूती त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
१. परीक्षा नियोजित वेळेपेक्षा २ मास अगोदर होणार असल्याचे कळल्यावर ताण येणे आणि ‘ही ईश्वरेच्छा आहे’, असा विचार केल्यावर गुरुकृपेने ताण उणावणे
‘आमची शेवटच्या वर्षाची परीक्षा नियोजित वेळेपेक्षा २ मास आधी होणार’, असे कळल्यावर मला पुष्कळ ताण येऊन भीतीही वाटत होती. मी प.पू. गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केली. देवाने माझ्या मनात विचार दिला, ‘ही ईश्वरेच्छा असून माझ्यासाठी योग्यच असणार आहे.’ त्यामुळे मला सकारात्मक वाटून माझ्या मनावरील ताण उणावला. इतर विद्यार्थी मला म्हणायचे, ‘‘हिला काही ताण नाही, म्हणजे हिचा अभ्यास पूर्ण झाला असेल.’’ तेव्हा मला प.पू. गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटायची.
२. खोलीत पाली येणे आणि सद़्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेल्या साहाय्यामुळे पालींचा त्रास दूर होणे
२ अ. खोलीत पाली येऊन त्यांच्या आवाजाने भीती वाटणे आणि सद़्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितलेला उपाय केल्यावर पालींचा त्रास न्यून होणे : परीक्षेच्या एक मास आधी माझ्या खोलीत पाली येऊ लागल्या. मला पाली आणि त्यांचा आवाज फार विचित्र आणि भीतीदायक वाटायचा. त्या बर्याच वेळा भूमीवर पडायच्या. माझे मन अभ्यासात एकाग्र झाल्यावर मला पाली दिसायच्या. मला त्यांची फार भीती वाटायची. त्यावर सद़्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी मला उपाय म्हणून ‘कंच वरद राजा’, हा मंत्र खोलीतील सगळ्या भिंतींवर खडूने लिहायला सांगितला. त्या मंत्रामुळे काही दिवस पालींचा त्रास न्यून झाला.
२ आ. सद़्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे खोलीतील अडगळीचे साहित्य काढल्यावर खोलीत पाली न येणे : थोड्या दिवसांनी पुन्हा पाली खोलीत येऊ लागल्या. हे सद़्गुरु जाधवकाकांना सांगितल्यावर त्यांनी मला खोलीतील अडगळीचे साहित्य काढून टाकण्यास सांगितले. खिडकीजवळ असलेली एक जुनी ‘बॅग’ मी पुष्कळ दिवसांपासून स्वच्छ केली नव्हती. ती ‘बॅग’ स्वच्छ केल्यावर खोलीत पाली आल्या नाहीत. ‘पालींच्या त्रासावर प.पू. गुरुदेवांनी सद़्गुरु जाधवकाकांच्या माध्यमातून उपाय सांगून माझा त्रास दूर केला’, याबद्दल मला कृतज्ञता वाटली.
३. उन्हाळ्यामुळे शरिरावर आलेले चट्टे कापूर आणि अत्तर यांच्या उपायांमुळे बरे होणे अन् सूर्यदेवाला प्रार्थना केल्यावर अर्धशिशीचा त्रास दूर होणे
त्या वेळी उन्हाळा असल्याने मला उष्णतेचा पुष्कळ त्रास होत होता. उष्णतेमुळे माझ्या शरिरावर पुष्कळ चट्टे उठले होते. कापूर आणि अत्तर यांच्या उपायांमुळे ते चट्टे बरे झाले. उन्हामुळे मला अर्धशिशीचा त्रास होऊ लागला. तेव्हा मी ‘हे सूर्यदेवते, तू माझ्या गुरूंचे एक रूप आहेस. तुझ्या प्रकाशकिरणांनी माझ्यावर अग्नितत्त्वाचे उपाय होऊन माझे स्वभावदोष, अहं आणि रोग दूर होऊ दे. मला चैतन्यदायी आणि उत्साही वाटू दे.’ ही प्रार्थना केल्यानंतर मला उष्णतेचा त्रास झाला नाही.
४. परीक्षा उत्तमरित्या पार पडून महाविद्यालयात प्रथम क्रमांक येणे
प.पू. गुरुदेवांची कृपा आणि सद़्गुुरु जाधवकाका यांचे आशीर्वादात्मक मार्गदर्शन यांमुळे माझी परीक्षा उत्तमरित्या पार पडली. त्यांच्या कृपेने मी महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मला गुरुदेवांच्या कृपेमुळे ही अनुभूती घेता आली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आधुनिक वैद्या (सौ.) शीतल नीलेश चौधरी (वय २८ वर्षे), चंद्रपूर (२८.१२.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |