​६३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील कु. गिरिजा नीलेश टवलारे (वय १० वर्षे) !

 ‘वर्ष  २०२० मध्‍ये ‘कु. गिरिजा नीलेश टवलारे उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आली असून ती ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची  आहे’ , असे घोषित करण्‍यात आले होते. वर्ष २०२३ मध्‍ये तिची पातळी  ६३ टक्‍के झाली आहे. आता तिच्‍यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्‍य संस्‍कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१६.२.२०२३)  
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘१० वर्षांच्‍या गिरिजाचे दृष्‍टीकोन ‘मोठ्यांनाही सुचणार नाहीत’, असे आहेत. ‘दैवी बालकांचे विचार किती प्रगल्‍भ असतात !’, याचे हे एक सुंदर उदाहरण आहे. हा लेख वाचतांना ‘तो संपूच नये’, असे वाटत होते. कु. गिरिजा हिची आध्‍यात्मिक उन्‍नती जलद गतीने होऊ दे’, अशी श्रीकृष्‍णाच्‍या चरणी प्रार्थना ! ’ – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१६.२.२०२३)

माघ कृष्‍ण द्वादशी (१७.२.२०२३) या दिवशी कु. गिरिजा नीलेश टवलारे हिचा १० वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त तिच्‍या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

कु. गिरिजा टवलारे

१. वय ७ ते ८ वर्षे

१ अ. आपत्‍काळाची सिद्धता करणे : ‘आपत्‍काळात पंखा नसणार; म्‍हणून कु. गिरिजा हिने अमरावती सेवाकेंद्रातील प्रत्‍येकाला एक हातपंखा सिद्ध करून दिला. त्‍या पंख्‍यातून उपाय होण्‍यासाठी तिने त्‍यावर दैनिक ‘सनातन प्रभात’चे पान कापून चिकटवले.

१ आ. भाव

१ आ १. पू. पात्रीकरकाका अन्‍य जिल्‍ह्यात गेल्‍यावर त्‍यांची आठवण काढून रडणे : एकदा पू. पात्रीकरकाका सेवेसाठी अमरावतीहून दुसर्‍या जिल्‍ह्यात गेले होते. त्‍यानंतर काही दिवसांनी गिरिजा अकस्‍मात् रडायला लागली आणि काही खात नव्‍हती. तिला त्‍याचे कारण विचारल्‍यावर ती म्‍हणाली, ‘‘पू. आजोबांची आठवण येत आहे. ते अमरावतीला कधी येणार ?’’ ती तिचे वडील बाहेरगावी गेल्‍यावरही कधी रडत नाही.

१ आ २. पू. पात्रीकरकाका यांच्‍याकडून त्‍यांचा जुना सदरा मागून घेऊन तो जपून ठेवणे : तिने पू. पात्रीकरकाका यांच्‍याकडून ते घालत नसलेला एक सदरा मागून घेतला आणि तो जपून ठेवला. ते आश्रमात नसतांना त्‍यांची आठवण आली किंवा तिला काही त्रास झाला, तर ती त्‍यांचा सदरा घालते.

१ आ ३. गिरिजाला पू. पात्रीकरकाकांच्‍या किंवा आमच्‍या कपड्यांना घडी घालण्‍याची सेवा सांगितल्‍यावर ती ‘ते कपडे परात्‍पर गुरुदेवांचे आहेत’, असा भाव ठेवून कपड्यांच्‍या घड्या घालते.

१ आ ४. अनेकदा ‘परम पूज्‍य तिच्‍या समवेत आहेत’, असे तिला जाणवते.’

– सौ. अनुभूती नीलेश टवलारे (कु. गिरिजाची आई), अमरावती

२. वय ८ ते ९ वर्षे 

श्री. नीलेश टवलारे

२ अ. जिज्ञासा : ‘गिरिजाला कुठलेही नवीन प्रकारचे यंत्र दिसले की, ती जिज्ञासेने त्‍याविषयी प्रश्‍न विचारते, उदा. सौरऊर्जा यंत्रणा, छायाचित्रक इत्‍यादी.

२ आ. शिकण्‍याची वृत्ती

१. ती भ्रमणभाषवर उत्तम छायाचित्र काढायला शिकली आहे. तिने छायाचित्रकाचीही माहिती जाणून घेतली आहे. ती म्‍हणते, ‘‘मी लवकरच रामनाथी आश्रमात छायाचित्रकाराची सेवा करायला जाणार आहे.’’

–  श्री. नीलेश टवलारे (कु. गिरिजाचे वडील), अमरावती

२. ‘दळणवळण बंदीच्‍या कालावधीत शाळा बंद असल्‍याने तिच्‍या वडिलांनी तिला संगणकावर मराठी टंकलेखन करायला शिकवले. ती काही दिवसांतच उत्तम प्रकारे टंकलेखन करायला शिकली. तिने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना संगणकावर टंकलेखन करून पत्र लिहिले आणि ते पू. पात्रीकरकाकांकडे दिले.

३. ती ग्रंथात पाहून आणि तिच्‍या आजीकडून (आईची आई, श्रीमती सुलभा डाऊ यांच्‍याकडून) रांगोळी काढायला शिकली. नवीन गोष्‍टी शिकल्‍यावर ‘हे सर्व परात्‍पर गुरुदेवच मला शिकवत आहेत’, असा तिचा भाव असतो.

२ इ. चित्रे काढणे : ती चित्रेही चांगली काढते. सद़्‍गुरु नंदकुमार जाधवकाका तिला म्‍हणाले, ‘‘तू चित्रकलेत प्रगती करशील.’’ पू. पात्रीकरकाका नेहमीच ‘तिचे चित्र बोलके असते’, असे तिच्‍या चित्राचे कौतुक करतात.

२ ई. तिला लहान मुले विशेष प्रिय आहेत. ती त्‍यांना प्रेमाने सांभाळते.

२ उ. इतरांना साहाय्‍य करणे : मला आध्‍यात्मिक त्रास होत असतांना किंवा मी रुग्‍णाईत असतांना ती मला साहाय्‍य करते. ती वयस्‍कर साधक आणि नातेवाईक यांनाही साहाय्‍य करते.

२ ऊ. पुढाकार घेणे : ‘बालसाधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍यातील बालसाधकांची संख्‍या न्‍यून झाली आहे’, असे लक्षात आल्‍यावर तिने पुढाकार घेऊन सर्वांना भ्रमणभाष केला आणि त्‍यांना आढाव्‍यात सहभागी होण्‍यास सांगितले.

२ ए. कशातही न अडकता वर्तमानात रहाणारी गिरिजा ! : गिरिजाला सेवाकेंद्रात, घरी, तसेच नातेवाईक किंवा साधक यांच्‍याकडे गेल्‍यावर वेगळेपणा वाटत नाही. इतर मुलांना नेहमीची जागा सोडून रहायला आवडत नाही; पण गिरिजा सगळीकडे सारख्‍याच मोकळेपणाने रहाते.

१. अमरावती सेवाकेंद्रात बांधकाम चालू असल्‍याने काही मास आम्‍हाला घरी रहावे लागले. तेव्‍हा तिने इमारतीमधील सगळ्‍यांशी ओळख करून घेतली. तिथे ती सर्वांची लाडकी झाली.

२. सेवाकेंद्राच्‍या तुलनेत आमचे घर लहान आहे. त्‍यामुळे घरी रहातांना आम्‍हाला बरीच तडजोड करावी लागत होती, तरीही तिने कधी गार्‍हाणे केले नाही. सेवाकेंद्रात पुन्‍हा जायचे ठरल्‍यावर तिने लगेच सामानाची बांधाबांध केली. सेवाकेंद्रात रहायला गेल्‍यावर ती तेथे पूर्वीप्रमाणेच राहू लागली.

३. आमच्‍याकडे कुणी नातेवाईक आले किंवा आम्‍ही त्‍यांच्‍याकडे गेलो, तर ती सर्वांशी आपुलकीने वागते; पण तिथून परत आल्‍यावर ती त्‍यांची विशेष आठवण काढत नाही. ती नेहमीप्रमाणे कृती करते.

२ ऐ. परिस्‍थिती स्‍वीकारणे : अमरावती सेवाकेंद्राचे बांधकाम संपत आल्‍यावर तिथे स्‍वच्‍छता करण्‍याची सेवा होती; म्‍हणून आम्‍ही घरून जेवून दिवसभर सेवाकेंद्रात जात होतो. तेव्‍हा तिथे पिण्‍याचे पाणी किंवा खाण्‍याचे साहित्‍य, असे काहीच नव्‍हते. सर्वत्र धूळ आणि माती असायची, तरीही गिरिजा प्रत्‍येक दिवशी उत्‍साहाने माझ्‍या समवेत येऊन स्‍वच्‍छतेच्‍या सेवेसाठी साहाय्‍य करायची. ती तेथील सर्व कामगारांशी प्रेमाने बोलत असल्‍याने सगळे तिचे कौतुक करायचे.’

– सौ. अनुभूती नीलेश टवलारे

३. वय ९ ते १० वर्षे 

श्रीमती सुलभा डाऊ

३ अ. कुठेही आनंदाने रहाणारी गिरिजा ! : ‘गिरिजाच्‍या आई-बाबांना बरे नसतांना ती माझ्‍या जवळ राहिली. तेव्‍हा तिने मला काही त्रास दिला नाही. तिने मला सेवेत साहाय्‍य केले. ती तिच्‍या मावशीच्‍या मैत्रिणींकडे गेली होती. त्‍यांनीही तिच्‍या मोकळेपणाचे आणि वागण्‍याचे कौतुक केले.’ – श्रीमती सुलभा डाऊ (कु. गिरिजाची आजी (आईची आई))

३ आ. सेवाकेंद्रात गृहव्‍यवस्‍थापनातील नोंदींची सेवा दायित्‍व घेऊन करणे : ‘अमरावती सेवाकेंद्रात साधकांची संख्‍या अल्‍प असल्‍यामुळे गृहव्‍यवस्‍थापन, म्‍हणजेच अंथरूण, पांघरूण आणि स्‍वच्‍छतेचे साहित्‍य यांच्‍या व्‍यवस्‍थापनाची घडी बसत नव्‍हती. ती मला म्‍हणाली, ‘‘आई, तू मला ही सेवा समजावून सांग. मी ही सेवा करते.’’ तिने साहित्‍याचे ‘साधक, पाहुणे आणि संत’, असे वर्गीकरण करून त्‍याची नोंदवही सिद्ध केली अन् आता त्‍यांच्‍या नोंदी करण्‍याची सेवा ती एकटी करते.

३ इ. लहान बहिणीने विचारलेल्‍या ‘देवाला लहान मुले का आवडतात ?’, या प्रश्‍नाचे गिरिजाने दिलेले उत्तर ! : एकदा गिरिजा तिच्‍या ६ वर्षांच्‍या चुलत बहिणीकडे (कु. संस्‍कृती टवलारे हिच्‍याकडे) गेली होती. तेव्‍हा तिने गिरिजाला विचारले, ‘‘देवाला लहान मुलेच का आवडतात ?’’ तेव्‍हा आम्‍ही तिथे नव्‍हतो. गिरिजाने विचार केला, ‘ही साधना करत नसल्‍याने तिला स्‍वभावदोषांविषयी सांगून कळणार नाही.’ तेव्‍हा तिचा संस्‍कृतीशी पुढीलप्रमाणे संवाद झाला.

कु. गिरिजा : आपला दादा (गिरिजाचा चुलत भाऊ कु. पद्मनाभ टवलारे (वय १३ वर्षे)) पुष्‍कळ खोड्या करतो आणि इतरांना त्रास देतो. आपल्‍याला तो आवडतो का ?

कु. संस्‍कृती : नाही, सगळ्‍यांना त्‍याचा राग येतो.

कु. गिरिजा : बघ, म्‍हणजे चुकीचे वागले, तर आपल्‍यालाच आवडत नाही, तर देवाला कसे आवडणार ? वय जसजसे वाढते, तसतसे लोकांचे वागणे पालटते. राग आणि इतरही गोष्‍टी वाढतात. देवालाही चांगल्‍या मनाचे लोक आवडतात. लहान वयातील मुले सहसा चुकीचे वागत नाहीत; म्‍हणून देवाला लहान मुले आवडतात. आपण प्रयत्न करून आपले वागणे चांगले ठेवले, तर मोठेपणीही आपण देवाला आवडणार.

कु. संस्‍कृती : हो, तू योग्‍य सांगत आहेस.

याप्रमाणे तिने अप्रत्‍यक्षपणे साधना करण्‍याचे महत्त्व तिला समजावून सांगितले.’

– सौ. अनुभूती नीलेश टवलारे

३ ई. मनाविरुद्ध घडल्‍यावर तो प्रसंग वहीवर लिहून आत्‍मनिवेदन करणारी गिरिजा ! : ‘बर्‍याचदा मी आणि गिरिजाची आई बाहेरगावी सेवेला जातो. तेव्‍हा ती सेवाकेंद्रातील अन्‍य साधक आणि बालसाधक यांच्‍या समवेत रहाते. अशा वेळी कधी तिच्‍या मनाविरुद्ध प्रसंग घडल्‍यास तिची चिडचिड होऊन तिला रडू येते. तेव्‍हा ती खोलीत एकटीच जाऊन बसते आणि घडलेला प्रसंग वहीत लिहिते. याविषयी तिने कधी आम्‍हाला सांगितले नाही. एकदा मला ते लिखाण दिसले. तेव्‍हा मी तिला त्‍याविषयी विचारल्‍यावर ती म्‍हणाली, ‘‘मी मनातले विचार परम पूज्‍यांना लिहून सांगते. तसे केल्‍यावर माझे मन हलके होते.’’ हे ऐकून ‘तिला या लहान वयात एवढे कसे सुचते?’, असे वाटून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.’       – श्री. नीलेश टवलारे

३ उ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रतीचा कृतज्ञताभाव : ‘डिसेंबर २०२२ मध्‍ये तिचे वडील तिला शाळेतून आणायला गेले होते. तिला घेऊन परत येतांना त्‍यांच्‍या दुचाकीचा अपघात झाला. गिरिजाच्‍या पायाला बरेच लागले होते; परंतु त्‍याकडे लक्ष न देता ती म्‍हणाली, ‘‘परम पूज्‍यांमुळेच आम्‍ही वाचलो. आम्‍ही गर्दीच्‍या ठिकाणी पडलो; पण विशेष काही झाले नाही.’’ एवढी दुखापत होऊनही तिने कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

३ ऊ. समाजातील लोकांना गिरिजाचे जाणवलेले वेगळेपण !

१. एकदा ‘गिरिजाच्‍या आजीकडे (वडिलांची आई, सौ. प्रतिभा रमेश टवलारे (वय ६८ वर्षे) यांच्‍याकडे) शारदादेवीसाठी कन्‍याभोजनाचा कार्यक्रम होता. तिथे आलेल्‍या महिला म्‍हणाल्‍या, ‘‘गिरिजाचा चेहरा देवीसारखा वाटतो. तिच्‍या सवयीही इतरांपेक्षा वेगळ्‍या अन् चांगल्‍या आहेत.’’

२. हिंदुत्‍वनिष्‍ठ वैद्य प्रदीप तरडेजा यांच्‍याकडे उपचारांसाठी जातांना मी गिरिजाला समवेत घेऊन गेले होते. तिथे उपचारासाठी आलेली एक महिला म्‍हणाली, ‘‘या मुलीच्‍या चेहर्‍यावर तेज आहे. ती देवीसारखी दिसते. तिच्‍याकडे बघून शांत वाटते.’’

३. २८.१२.२०२२ या दिवशी अमरावती येथील श्री एकवीरादेवीच्‍या मंदिरात दर्शनाला गेल्‍यावर तेथील गुरुजी म्‍हणाले, ‘‘तुमची मुलगी साक्षात् अंबामाताच आहे.’’

४. शाळेतील शिक्षकही गिरिजाचे पुष्‍कळ कौतुक करतात. गिरिजाच्‍या चित्रकलेच्‍या शिक्षकांना ‘गिरिजावरील संस्‍कार चांगले आहेत’, असे लक्षात आले. त्‍यामुळे ते साधनेची माहिती जाणून घेण्‍यासाठी अमरावती सेवाकेंद्रात आले होते.’

– सौ. अनुभूती नीलेश टवलारे

३ ए. सूक्ष्मातील कळण्‍याची क्षमता : ‘एकदा भक्‍तीसत्‍संगात एक दैवी आवाज ऐकवून तो ओळखण्‍यास सांगितला होता. तेव्‍हा गिरिजाने लगेच ‘तो आवाज ‘ॐ’चा आहे’, असे सांगितले. तिचे उत्तर योग्‍य होते.’ – श्री. आनंद डाऊ (कु. गिरिजाचा मामा)

३ ऐ. जाणवलेला पालट : ‘पूर्वी गिरिजाला कुणीही काही वस्‍तू आणायला सांगितल्‍यावर ती ओरडून बोलायची; पण आता ती सांगितलेली वस्‍तू लगेच आणते.’ – श्रीमती सुलभा डाऊ (कु. गिरिजाची आजी (आईची आई))

४. स्‍वभावदोष : ‘राग येणे आणि अव्‍यवस्‍थितपणा.’

– सौ. अनुभूती नीलेश टवलारे (कु. गिरिजाची आई), अमरावती

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.१२.२०२२)

कु. गिरिजाच्‍या मनावर चांगले संस्‍कार होण्‍यासाठी तिच्‍या आईने ती झोपण्‍यापूर्वी तिला सकारात्‍मक सूत्रे सांगणे : ‘पूर्वी मी वाचले होते, ‘लहान मुुलांच्‍या मेंदूचा विकास झोपेत अधिक होतो. त्‍यामुळे त्‍यांना झोपतांना चांगल्‍या गोष्‍टी सांगाव्‍यात’; म्‍हणून मी प्रतिदिन गिरिजाला झोपतांना किंवा झोपायच्‍या थोडा वेळ आधी पुढील काही सूत्रे सांगते.

१. तुला उद्या पुन्‍हा साधनेचे नव्‍याने प्रयत्न करायचे आहेत. तू आज जे करू शकली नाहीस, ते तुला उद्या करायचे आहे.

२. ‘कधीही मोठ्यांचा अपमान होईल’, असे बोलायचे नाही.

३. एखादी गोष्‍ट पटली नाही आणि चिडचिड होत असेल, तर थोडा वेळ शांत रहायचे; पण चिडचिड करायची नाही.

४. जेव्‍हा कुणी प्रेमाने आपल्‍याला खाऊ देत असेल, तेव्‍हा ‘खाऊ काय आहे ?’, हे बघायचे नाही. त्‍यामागचे त्‍यांचे प्रेम बघायचे. तो एक प्रकारे संतांनी दिलेला प्रसाद असतो.’

– सौ. अनुभूती नीलेश टवलारे (कु. गिरिजाची आई), अमरावती (३०.१२.२०२२)

सूक्ष्म ज्ञानेंद्रिये जागृत असलेली आणि संत अन् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असलेली ६३ टक्‍के पातळीची कु. गिरिजा टवलारे (वय १० वर्षे) !

पू. अशोक पात्रीकर

१. सूक्ष्मातील कळण्‍याची क्षमता : ‘गिरिजाचे आई-बाबा पूर्णवेळ साधना करू लागण्‍यापूर्वी अमरावती येथेच त्‍यांच्‍या घरी राहून साधना आणि सेवा करायचे. तेव्‍हा विदर्भात सद़्‍गुरु नंदकुमार जाधवकाका अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या सेवेला येत असत. गिरिजाच्‍या घरी एक मोगर्‍याचे रोप होते. त्‍या रोपाला मोगर्‍याचे फूल लागल्‍यावर गिरिजा तिच्‍या आई-बाबांना सांगायची, ‘‘आज सद़्‍गुरु जाधवकाका अमरावतीला येणार आहेत’’ आणि त्‍या दिवशी सद़्‍गुरु जाधवकाका अमरावतीला सेवाकेंद्रात यायचे. यातून ‘तिची सूक्ष्म ज्ञानेंद्रिये जागृत आहेत’, हे लक्षात येते.

२. संत आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रतीचा भाव : मी विदर्भात प्रसारसेवेसाठी आल्‍यानंतर गिरिजाचे आई-बाबा पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी अमरावती सेवाकेंद्रात रहायला आले. मी सेवाकेंद्रातील माझ्‍या पटलावर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणांचेे छायाचित्र ठेवतो आणि अन्‍य जिल्‍ह्यांत प्रसारासाठी जातांना ते छायाचित्र समवेत नेतो. दौर्‍याहून परत येण्‍याचा दिवस मी सेवाकेंद्रात कळवतो. हे गिरिजाला तिच्‍या आईकडून किंवा अन्‍य कुणाकडून कळते. मी सेवाकेंद्रात ज्‍या दिवशी येणार, त्‍या दिवशी ती माझ्‍या त्‍या पटलावर फुले किंवा फुलांचा हार वहाते.’

– (पू.) अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे), अमरावती (२७.१.२०२३)

  • सूक्ष्म : व्‍यक्‍तीचे स्‍थूल म्‍हणजे प्रत्‍यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्‍वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्‍या पलीकडील म्‍हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्‍या काही व्‍यक्‍तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्‍या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्‍लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक