‘वंदे भारत’ रेल्‍वेमुळे आर्थिक केंद्रे धार्मिक केंद्रांना जोडली जातील ! – पंतप्रधान

पंतप्रधानांच्‍या हस्‍ते ‘मुंबई-शिर्डी’ आणि ‘मुंबई- सोलापूर’ ‘वंदे भारत’ रेल्‍वे गाड्यांचा शुभारंभ

मुंबई – ‘वंदे भारत’ रेल्‍वे भारताच्‍या विकासाची गती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे प्रतीक आहे. देशातील १७ राज्‍यांतील १०८ जिल्‍हे या रेल्‍वेने जोडण्‍यात आले आहेत. आधुनिक संपर्क यंत्रणेसाठी ‘वंदे भारत’ रेल्‍वे महत्त्वाचे योगदान देईल. विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी आणि भाविक या सर्वांना ‘रेल्‍वे भारत’ लाभदायी ठरेल. या रेल्‍वेमुळे आर्थिक केंद्रे धार्मिक केंद्रांना जोडली जातील, असे उद़्‍गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. १० फेब्रुवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘मुंबई-सोलापूर’ आणि ‘मुंबई-शिर्डी’ या अनुक्रमे ९ अन् १० व्‍या ‘वंदे भारत’ रेल्‍वेगाड्यांचे उद़्‍घाटन झाले. या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी व्‍यासपिठावर राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी, विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्‍वेमंत्री अश्‍विन वैष्‍णव आदी उपस्‍थित होते. या वेळी मुख्‍यमंत्री शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री फडणवीस यांनी श्री गणेशाची मूर्ती देऊन पंतप्रधान मोदी यांचा सन्‍मान केला. पंतप्रधानांनी मराठी भाषेत भाषणाला प्रारंभ केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्‍हणाले,

१. ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वेमुळे तीर्थक्षेत्रांचे दर्शन सुलभ होईल. या रेल्‍वेगाड्या सह्याद्रीच्‍या पर्वतरांगांतून जातांना निसर्गाचे सौंदर्यही अनुभवता येईल.

२. यापूर्वी खासदार त्‍यांच्‍या भागांतील स्‍थानकांवर रेल्‍वेगाडी थांबण्‍याची मागणी करत. आता ते ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वे चालू करण्‍याची मागणी करत आहेत. हे भारताच्‍या आधुनिकतेचे लक्षण आहे.

३. केंद्रीय अर्थसंकल्‍पामध्‍ये पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली आहे. भारताच्‍या इतिहासात मागील ९ वर्षांत पायाभूत सुविधांच्‍या निधीत ५ पटींनी वाढ करण्‍यात आली आहे. यामुळे गरिबांना रोजगार मिळेल, तर पायाभूत सुविधा निर्माण झाल्‍यावर उद्योगांना चालना मिळेल.

४. अर्थसंकल्‍पात रेल्‍वेसाठीही प्रथमच सर्वाधिक निधी देण्‍यात आला आहे. यामुळे महाराष्‍ट्रात संपर्कयंत्रणा वाढेल.