महाराष्‍ट्र सरकारकडून बाभळी बंधारा प्रश्‍नावर प्रस्‍ताव पाठवूनही तेलंगाणा सरकारकडूनच प्रतिसाद नाही !

तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री चंद्रशेखर राव यांच्‍याकडून खोटी माहिती !

संभाजीनगर – नांदेड जिल्‍ह्यातील बाभळी बंधार्‍याचा विषय १० वर्षांपासून महाराष्‍ट्रासाठी अडचणीचा ठरत आहे. तेलंगाणा सरकार या प्रकरणात गेल्‍या अनेक वर्षांपासून महाराष्‍ट्रासमवेत कुठलीही चर्चा करत नाही. आता ‘भारत राष्‍ट्र समिती’चे नेते आणि तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्‍ट्रात राजकारणाचा प्रवेश करतांना बाभळीसह श्रीराम सागर प्रकल्‍पातून पाणी देण्‍याचे आश्‍वासन दिले होते; मात्र तत्‍कालीन मुख्‍यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी राव यांना पत्रे पाठवल्‍यानंतरही त्‍यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नव्‍हता.

मुख्‍यमंत्री चंद्रशेखर राव

२ दिवसांपूर्वी नांदेड येथे झालेल्‍या कार्यक्रमात बाभळी बंधार्‍याविषयी महाराष्‍ट्राकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्‍यामुळे मुख्‍यमंत्र्यांनी एकत्र बसून तोडगा काढण्‍याचे आश्‍वासन राव यांनी दिले आहे; मात्र महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी तोडग्‍यासाठीचा प्रस्‍ताव अगोदरच दिला होता. बाभळी प्रकरणात २८ फेब्रुवारी २०१३ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाने बंधार्‍याचे दरवाजे २८ ऑक्‍टोबर २०१३ पर्यंत उघडेच रहातील, असा निर्णय दिला होता.

फडणवीस यांनी पत्र लिहून कळवले होते की, ‘वर्ष २०१३ ते २०१५ या काळात पाण्‍याच्‍या कमतरतेमुळे बाभळी येथे पाणीसाठा झाला नाही. त्‍यामुळे ०.६ टी.एम्.सी. पाणी सोडता आले नाही, तसेच चांगला पाऊस झाल्‍यास सोडलेले पाणी भरल्‍यानंतर समुद्रात जाते. त्‍यामुळे याविषयी आपण तोडगा काढू. तुम्‍ही सांगाल त्‍या दिवशी मुंबई येथे याविषयी तुमचे जलसंपदामंत्री, अधिकारी आणि आपण बैठक घेऊ. त्‍याविषयीची वेळ आणि दिनांक कळवावे’; मात्र त्‍याला राव यांनी प्रतिसाद दिला नाही.