भूकंपग्रस्त तुर्कीयेच्या नागरिकांसाठी भारतीय सैन्य ठरले देवदूत !

तुर्कीयेच्या महिलेने मानले भारतीय सैनिकांचे आभार !

अंकारा (तुर्कीये) – भूकंपग्रस्त तुर्कीयेच्या नागरिकांसाठी भारतीय सैन्य देवदूत ठरले आहे. यासाठी तुर्कीयेची महिला एका भारतीय सैनिकाचे आभार मानत असल्याचे छायाचित्र भारतीय सैन्याने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रसारित करून त्याखाली ‘वी केअर’ (आम्ही काळजी घेतो) असे लिहिले आहे. यावरून सामाजिक माध्यमांतून भारतीय सैन्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

भूकंपग्रस्तांच्या साहाय्यासाठी भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन दोस्त’ राबवण्यात येत आहे. या अंतर्गत वैद्यकीय साहित्य, फिरते रुग्णालय, शोध आणि बचाव पथके आदी पाठवण्यात आले आहे. भारतीय पथकाने एका ६ वर्षांच्या मुलीला ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात यश मिळवले.

मृतांची संख्या २१ सहस्रांहून अधिक !

तुर्कीये आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत २१ सहस्रांहून  अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी तुर्कीयेत १७ सहस्रांहून अधिक, तर सीरियात ३ सहस्रांहून अधिक लोक मरण पावले आहेत.