गोवा मुक्तीलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली निवर्तले !

नागेश करमली

पणजी, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा मुक्तीलढ्यातील धगधगता निखारा, प्रखर राष्ट्राभिमानी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा साहित्यिक नागेश करमली (वय ९० वर्षे) यांचे ९ फेब्रुवारी या दिवशी दुपारी त्यांच्या रायबंदर-पाटो येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १० फेब्रुवारी या दिवशी सकाळी१० वाजता सांतिईनेज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नागेश करमली यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, तसेच विविध क्षेत्रांमधून त्यांना आदरांजली वहाण्यात आली.

५ फेब्रुवारी या त्यांच्या वाढदिवशी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यानंतर प्रकृतीत सुधारणा दिसल्याने त्यांना घरी आणण्यात आले होते. नागेश करमली यांचा जन्म वर्ष १९३३ या दिवशी काकोडा येथे झाला. नागेश करमली यांनी गोवा मुक्तीलढ्यात स्वत:ला झोकून देतांना पोर्तुगिजांकडून अमानुष मारहाणही सहन केली होती. प्राथमिक शिक्षणातील माध्यम प्रश्नावरील आंदोलनात मातृभाषेच्या रक्षणार्थ ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’च्या माध्यमातून ते अंत्यत पोटतिडकीने वावरले. अराष्ट्रीय कृत्यांवर ते तुटून पडत होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘ट्वीट’द्वारे शोक व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ पुढारी नागेश करमली यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. गोवा मुक्तीसाठी त्यांनी दिलेले योगदान हे गोवा सदैव स्मरणात ठेवील.’ कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ यांनी नागेश करमली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

नागेश करमली यांचा कोकणी भाषा मंडळाच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा होता. गझल हा प्रकार त्यांनी कोकणीत रूजवला. त्यांनी मराठी वर्तमानपत्रातही स्तंभलेखन केले आहे. आकाशवाणी, पणजी केंद्रावर त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे आणि तेथूनच ते सेवानिवृत्त झाले. वर्ष १९८० च्या दशकात आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर ‘फोडणी फोंव’ या कार्यक्रमासाठी ते पटकथा लिहित. त्यातील ‘राजाराम राटावळी’ हे त्यांचे पात्र पुष्कळ गाजले होते.

नागेश करमली यांना मिळालेले मान-सन्मान

१. वर्ष १९७२ मध्ये भारत सरकारच्या वतीने ताम्रपट देऊन गौरव
२. वर्ष १९९२ मध्ये त्यांच्या ‘वंशकुळाचे देणे’ या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला.
३. वर्ष २००८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते गौरव