(म्हणे) ‘भीक मागण्यापेक्षा एका हातात कुराण आणि दुसर्‍या हातात अणूबाँब घेतल्यास जग तुमच्यासमोर झुकेल !’ – मौलाना साद रिझवी, ‘तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’

‘तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ या पक्षाचे नेते मौलाना साद रिझवी यांचा पाक सरकारला सल्ला

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तुम्ही जगाकडे पदर पसरवला; पण तुम्हाला कुणीही भीक घातली नाही. पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रीमंडळ विमान भरून आणि सैन्यदलप्रमुखांना घेऊन तुम्ही जगाच्या कानाकोपर्‍यात भीक मागितली; पण तुम्हाला प्रत्येकाने अटी मान्य करायला लावल्या. तुम्ही पैसे मागण्यासाठी का जाता ? अशा प्रकारे भीक मागण्यापेक्षा एका हातात कुराण आणि दुसर्‍या हातात अणूबाँब घ्या आणि स्विडनला जा. मग बघा संपूर्ण जगाने तुमच्यापुढे नमते नाही घेतले, तर माझे नाव पालटा, असे विधान ‘तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ या पक्षाचे नेते मौलाना (इस्लामचे अभ्यासक) साद रिझवी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ पाकिस्तानमधील सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे. आर्थिक दिवाळखोरीकडे जाणार्‍या पाकला साहाय्य करण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीन, सौदी अरेबिया आदी देशांना विनंती केली होती; मात्र त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यावर रिझवी बोलत होते.

गेल्या काही आठवड्यांपासून रासमुस पालुदान ही व्यक्ती प्रत्येक शुक्रवारी स्विडनमध्ये कुराण जाळत आहे. त्यामुळे रिझवी यांनी स्विडनचे नाव घेतले आहे.

संपादकीय भूमिका 

अणूबाँब केवळ पाकिस्तानकडेच आहे, अशा आविर्भावात रिझवी बोलत आहेत, असेच लक्षात येते ! यातून त्यांचे ‘ज्ञान’ किती अगाध आहे, हेही लक्षात येते !