आज २५ जानेवारी २०२३ या दिवशी श्री गणेश जयंती आहे. त्या निमित्ताने. . . !
‘माघ शुक्ल ४ हा दिवस श्री गणेशाचा जन्मदिन म्हणून मानला जातो. गणपति हा शंकर-पार्वतीचा पुत्र आहे. पद्मपुराण, मत्स्यपुराण, स्कंदपुराण आदी ग्रंथांतून याच्या जन्माच्या कथा दिल्या आहेत. ‘पार्वतीने आपल्या अंगावरील उटण्याची मूर्ती बनवून ती सजीव केल्यावर गणपति निर्माण झाला; आदितीच्या पोटी हा महोत्कट रूपाने जन्मास आला; पार्वती स्नान करत असतांना द्वाररक्षकाचे काम करणार्या गणपतीने भगवान शंकरालाही मज्जाव केला, त्यामुळे युद्ध झाले आणि शंकरांनी याचे मस्तक तोडले; परंतु पार्वतीसाठी शंकरांनी परत इंद्राच्या हत्तीचे मस्तक बसवले; शनीच्या दृष्टीपाताने गणपतीचे मस्तक जळाले; परंतु देवांनी तेथे हत्तीचे मस्तक बसवले’, अशा अनेक कथा पुराण ग्रंथांतून वर्णन केल्या आहेत.
कित्येक ठिकाणी गणेशाच्या बालचरित्रांचेही वर्णन आढळते. महाभारतासारख्या अवाढव्य ग्रंथनिर्मितीच्या वेळी श्री गणेश हाच ‘लेखक’ असल्याचा उल्लेख आहे. गणपतीचे गृत्समद, राजा वरेण्य, मुद़्गल ऋषि आणि मोरया गोसावी असे थोर भक्त आहेत.
गणपति हा ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ असून तो भारतियांचे आराध्य दैवत बनला आहे. शैव-वैष्णव या दोन्ही पंथांचे लोक गणपतीची उपासना करतात. तमिळनाडूमध्ये तंजावर येथे प्रसिद्ध असे गणपतीचे देवालय आहे. त्रिचनापल्ली येथे ‘उच्छि पिल्लेयर’ हे अत्यंत भव्य असे गणेश मंदिर आहे. गणपतीच्या उपासकांचा ‘गाणपत्य पंथ’ मान्यतेस पावलेला आहे. कृतयुगात विनायक, त्रेतायुगात मयुरेश्वर, द्वापरयुगात गजानन असे गणपतीच्या अनेक अवतारांचे वर्णन आढळते. पेशव्यांचे आराध्य दैवत गणपति हेच होते. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात अष्टविनायकांची स्थाने असून ती प्रसिद्ध आहेत.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)