कर्नाटक सरकारवर साखर उत्पादकांचा दबाव! – कर्नाटकमधील आपचे नेते राजकुमार तोप्पन्नवर यांचा आरोप म्हादई जलवाटप तंटा

 

पणजी, २२ जानेवारी (वार्ता.) – म्हादई नदीचे पाणी वळवल्याने त्याचा बेळगाव, धारवाड आणि हुब्बळ्ळी येथील नागरिकांना कोणताच लाभ होणार नाही. म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवले जाणार आहे. हे पाणी खानापूर, बैलहोंगल आणि सौंदती या मार्गाने वहाणार आहे. कर्नाटक सरकार म्हादईचे पाणी लोकांना पिण्यासाठी नव्हे, तर ते साखर उत्पादकांच्या ऊस लागवडीसाठी वळवत आहे. म्हादई आणि काळी नदी यांचे पाणी वळवण्यासाठी साखर उत्पादकांचा कर्नाटक सरकारवर दबाव आहे, असा आरोप कर्नाटकमधील ‘आप’चे नेते राजकुमार तोप्पन्नवर यांनी गोव्यातील खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना केला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘नागरिकांची तृष्णा भागवण्यासाठी म्हादई नदीचे पाणी वळवण्याची आवश्यकता नाही. कृष्णा पाणी तंटा लवादाने दिलेले ५० टी.एम्.सी. पाणी कर्नाटक सरकार वाया घालवत आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरता आले असते. म्हादईचे पाणी वळवल्यास त्याचा कर्नाटकच्या अनेक भागांवर विपरीत परिणाम होणार आहे. कर्नाटकने सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवणे आवश्यक आहे. यामुळे कृषीसाठी आणि पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते.’’