भ्रमणभाषचा शोध लागल्यापासून तो जगभरातील कानाकोपर्यात पोचल्यापर्यंतचा काळ अनेकांनी पाहिला आहे आणि पहात आहेत. पूर्वी पत्र किंवा तार यांच्या माध्यमांतून जगातील नागरिक एकमेकांच्या संपर्कात असत. मधल्या काळात दूरभाषचा शोध लागल्यावर भारतात केवळ श्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गीय यांच्यापर्यंत तो मर्यादित होता. भ्रमणभाषचीही प्रारंभी तीच स्थिती होती; मात्र नंतर तंत्रज्ञानामध्ये क्रांती झाली आणि आजच्या स्थितीला देशातील ८० कोटी लोकांच्या हातात भ्रमणभाष पोचले आहेत. इतकेच नव्हे, तर भारताने त्यापुढे जाऊन प्रगती केली आहे आणि ती म्हणजे कारागृहात शिक्षा भोगणारेही बिनदिक्कतपणे भ्रमणभाषचा वापर करून खंडणी गोळा करण्यासह एखाद्याला ठार मारण्याची धमकीही देऊ लागले आहेत. ही प्रगती अन्य कोणत्या देशांना जमली आहे, हे समजण्यास मार्ग नाही; मात्र भारताने ते ‘करून दाखवले’ आहे. आतातर बेळगावमधील कारागृहात अटकेत असणार्या एका गुन्हेगाराने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भ्रमणभाष करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे समोर आल्याने उद्या भारताचेच नाही, तर विदेशातील राष्ट्रपती, पंतप्रधान यांनाही अशी धमकी कुणी देशातील कारागृहातून दिली, तर आश्चर्य वाटू नये. गुन्हेगारांकडून कारागृहात भ्रमणभाषचा वापर होतो, हे भारतियांना काही नवीन नाही; मात्र अशा घटना कारागृह प्रशासन आणि संबंधित राज्यांतील सरकारे यांनी थांबवलेल्या नाहीत, हीच गोष्ट महत्त्वाची आहे. ‘हा प्रकार देशातून नष्ट होईल’, अशी शक्यता भारतियांना वाटत नाही. याचे कारण म्हणजे अगदी खालपर्यंत मुरलेला भ्रष्टाचार ! ‘गुन्हेगारांना कारागृहामध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी पैसे दिल्यानंतर अवैधरित्या मिळतात’, हे उघड असतांना ते रोखण्यासाठी काही प्रयत्न करण्यात आले आहेत, असे जनतेला दिसत नाही. कधी तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक कारागृहाचा दौरा करतो आणि त्याला अशा गोष्टी लक्षात येतात. त्या वेळी थातुरमातुर कारवाई केली जाते आणि पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या !’ असेच चालू रहाते. देहलीच्या तिहार कारागृहात मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर हा प्रतिमास दीड कोटी रुपये कारागृह प्रशासनाला देत होता. त्या बदल्यात त्याला सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळत होत्या. कारागृहात राहूनच तो खंडणीसाठी भ्रमणभाष करून पैसे उकळत होता. याचाच अर्थ बाहेर राहिलो काय आणि कारागृहात राहिलो काय, हे अशा ‘श्रीमंत’ गुन्हेगारांसाठी वेगळे नसते. शेकडो कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्क घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याला कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश असतांना त्याची एका पंचतारांकित सदनिकेत बडदास्त ठेवण्यात आली होती. हे उघड झाल्यावर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आली. त्यांना पुढे काय शिक्षा झाली ? किंवा त्यांना असे करण्यास कुणी आदेश दिले होते ? हे काही समजू शकलेले नाही. अशा अनेक घटना देशातील कारागृहात घडत असतात. हे कोण रोखणार ? असा प्रश्न आहे.
कारागृहांचे स्वरूप पालटण्याची आवश्यकता !
गुन्हेगाराला पकडल्यावर त्याला कारागृहात सुधारण्यासाठी ठेवले जाते. त्याला त्याच्या चुकीची, गुन्ह्यांची जाणीव व्हावी, तसेच त्याने गुन्हेगारी कारवाया करत राहू नये; म्हणून त्याला पकडून कारागृहात ठेवण्याची ही जगातील प्राचीन प्रक्रिया आहे; मात्र यातून किती गुन्हेगारांना चुकीची जाणीव होते किंवा तो पुन्हा गुन्हेगारी कृत्य करण्याचे सोडून देतो, हा एक संशोधनाचा विषय आहे. काही गुन्हे हे अजाणतेपणे झालेले असतात किंवा एखाद्या प्रसंगामुळे कृत्य केलेले असते; मात्र जो सराईत असतो, त्याला त्याची वृत्ती पालटण्यासाठी कारागृहामध्ये शिक्षेसमवेत त्याच्यावर संस्कार करणे आवश्यक असतात. असे संस्कार भारतीय कारागृहात होत नाहीत, हे स्पष्ट आहे. उलट एखादी व्यक्ती लहानशा गुन्ह्यासाठी कारागृहात गेल्यावर तेथे अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात येतो आणि तेथून बाहेर आल्यावर ती सराईत गुन्हेगार झाली, अशी अनेक प्रकरणे वाचनात आलेली आहेत. त्यामुळे कारागृहाचे स्वरूप संपूर्णपणे पालटण्याची आवश्यकता आहे, हे पुन्हा एकदा लक्षात येते.
संस्कारी पालक हवेत !
देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कायद्यांसह जनतेवर योग्य संस्कार करून तिच्यात गुन्हेगारी वृत्ती निर्माण होऊ नये अन् जर गुन्हेगारी वृत्ती असेल, तर ती नष्ट करायला हवी, यासाठी शासनव्यवस्थेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळेला रामराज्याचे उदाहरण ‘आदर्श राज्यव्यवस्था’ म्हणून दिले जाते. याचे कारण तेथे प्रभु श्रीराम हा राजा होता, म्हणजे राजा जर श्रीराम असेल, तर प्रजाही नीतीमान असते, हे स्पष्ट होते. ‘यथा राजा तथा प्रजा’, ही म्हण आपल्याला ठाऊकच आहे. असा राजा निर्माण होण्यासाठी पालकांनी मुलांवर संस्कार करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतः पालक संस्कारी आणि साधना करणारे असले पाहिजेत. तेव्हाच ते त्यांच्या मुलांवर योग्य संस्कार करू शकतील. अशी संस्कारी पिढी समाजामध्ये निर्माण झाली, तर त्यातूनच एखादा श्रीरामासारखा राजा निर्माण होऊ शकतो. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर साधना आणि नीतीमत्ता यांचे संस्कार केल्यामुळेच ते आदर्श अन् जाणते राजे झाले. असे आपण आपल्या मुलांना घडवतो का ? याचा विचार प्रत्येक पालकाने केला पाहिजे. आजचे पालक मुले डॉक्टर, इंजिनीयर, अधिवक्ते व्हावेत आणि त्यांनी भरपूर पैसा कमवावा, असे वाटत असते; मात्र मुलगा संस्कारी असावा आणि त्याने देश अन् धर्म यांचे रक्षण करावे, असे वाटणारे पालक या देशात किती आहेत ? हाही संशोधनाचा विषय ठरेल. असे होत नसल्यामुळेच आज रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट केली जाते, अधिवक्ते खोट्याचे खरे करतात, अभियंते पडणार्या इमारती बांधतात आणि शासनकर्ते जनतेला लुबाडतात, हे लक्षात घ्यायला हवे ! त्यामुळे प्रथम पालकांनी साधना करून धर्माचरण केले पाहिजे आणि पाल्यांवर तसे संस्कार केले, तर राजा अन् प्रजा दोन्ही नीतीमान होतील !
जनतेवर योग्य संस्कार केले, तरच कायदा आणि सुव्यवस्था कायम रहाते ! |