गडहिंग्‍लज येथे १० जानेवारीला हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

गडहिंग्‍लज येथील पत्रकार परिषेदत डावीकडून डॉ. मानसिंग शिंदे, श्री. राहुल शिंदे, श्री. किरण दुसे, श्री. संदीप नाथबुवा, तसेच सौ. विजया वेसणेकर

गडहिंग्‍लज (जिल्‍हा कोल्‍हापूर), ७ जानेवारी (वार्ता.) – हिंदु राष्‍ट्राचा आवाज बुलंद करण्‍यासाठी १० जानेवारी या दिवशी गडहिंग्‍लज शहरात म.दु. श्रेष्‍ठी विद्यालय येथे सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा घेण्‍यात येणार आहे. या सभेत सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्‍ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्‍य समन्‍वयक श्री. मनोज खाडये, हिंदु विधीज्ञ परिषदेचे महाराष्‍ट्र अधिवक्‍ता संघटक नीलेश सांगोलकर हे वक्‍ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सनातन संस्‍थेचे डॉ. मानसिंग शिंदे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. राहुल शिंदे, भाजपचे गडहिंग्‍लज तालुका सरचिटणीस श्री. संदीप नाथबुवा, हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. विजया वेसणेकर उपस्‍थित होत्‍या. या सभेसाठी वारकरी संप्रदायाचे श्री. सोमगोंडा देसाई यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

या प्रसंगी श्री. संदीप नाथबुवा म्‍हणाले, ‘‘या देशात विविध प्रकारचे जिहाद कार्यरत असून हे प्रकार गंभीर आहेत. हिंदूंमध्‍ये जागृती करण्‍यासाठीच ही सभा आहे. या सभेसाठी हिंदूंनी अधिकाधिक संख्‍येने उपस्‍थित रहावे, असे आवाहन भाजपच्‍या वतीने आम्‍ही करत आहोत.’’ श्री. राहुल शिंदे म्‍हणाले, ‘‘हिंदुत्‍वासाठी कार्य करणार्‍या विविध संघटना यांचा उद्देश एकच आहे. हिंदु धर्म रक्षण आणि संघटन यांसाठी एक हिंदु म्‍हणून प्रत्‍येकाने सभेसाठी उपस्‍थित रहाणे आवश्‍यक आहे.’’

पोलिसांनी वाहनफेरीची वेळेत अनुमती न दिल्‍याने फेरी रहित ! – श्री. किरण दुसे

सभेच्‍या प्रसारासाठी ६ जानेवारीला वाहन फेरी काढण्‍यात येणार होती. त्‍यासाठी २९ डिसेंबर २०२२ ला गडहिंग्‍लज पोलीस ठाण्‍यात अनुमती आवेदन सादर केले होते. फेरीसाठी पोलिसांनी लेखी अनुमती वेळेत न दिल्‍याने ही फेरी रहित करण्‍यात आली आहे, असे श्री. किरण दुसे यांनी सांगितले.