अभिनेत्री उर्फी जावेदरूपी स्त्रीदेहाचा बाजार रोखा !

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई – अभिनेत्री उर्फी जावेद ही मुंबईच्या रस्त्यांवर विचित्र कपडे परिधान करते. उर्फीरूपी स्त्रीदेहाचा बाजार रोखा, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेत त्यांच्याकडे पत्राद्वारे केली. या वेळी त्यांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीटही केले आहे.

पत्रात त्यांनी म्हटले आहे की, उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात स्वतःच्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय झाला आहे. राज्यघटनेने दिलेला आचार आणि विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल, याची कुणीच कल्पना केली नसेल. स्त्रीदेहाचे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांना कलंक आहे. तिने प्रसिद्धीसाठी देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. ‘अशा पद्धतीच्या भावना चेतवणार्‍या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला मी खतपाणी घालत आहे’, याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्यासाठी तिच्यावर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.

संपादकीय भूमिका 

हे पोलिसांना सांगावे का लागते ? लैंगिकतेचे भर रस्त्यात उघड प्रदर्शन करणार्‍यांवर पोलीस स्वतःहूनच कारवाई का करत नाहीत ?