अमरावती येथील उमेश कोल्हे यांची तबलिगी जमातने हत्या केल्याचे उघड !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या आरोपपत्रात स्पष्ट

अमरावती – येथील वैद्यकीय व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जूनच्या रात्री न्यू हायस्कूलसमोर गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयात सादर केमलेल्या आरोपपत्रात ही माहिती दिली आहे. ‘हा हत्येचा साधा खटला असल्याचा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला होता; मात्र अमरावतीसह अन्य राज्यांतील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा सुनियोजित कट होता’, असे आरोपपत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या प्रकरणात तबलिगी जमातच्या एकूण ११ आरोपींचा समावेश आहे. तबलिगी जमात ही एक आंतरराष्ट्रीय देवबंदी इस्लामिक मिशनरी चळवळ आहे. तबलिगी जमात इस्लामिक नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी आग्रही आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर धर्मांधांनी त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. सामाजिक माध्यमांवर त्यांच्या समर्थनार्थ नूपुर शर्मा यांच्या काही पोस्ट प्रसारित केल्याने कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या आरोपपत्रात काय म्हटले आहे ?

हत्येतील प्रत्येक व्यक्ती तबलिगी जमातशी संबंधित असून त्यांतील सूत्रधारांपैकी एक असलेला इरफान खान हा जमात आणि त्याच्या नियमांचा कठोर अनुयायी आहे.
हत्येचा सूत्रधार इरफान ‘सायबर हेल्पलाइन’ नावाची स्वयंसेवी संस्था चालवत होता. हत्येच्या प्रकरणातील अन्य आरोपीही या संस्थेशी संबंधित आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या संस्थेला काही आखाती देश आणि पाकिस्तान यांच्याकडून निधी प्राप्त होत होता.

संपादकीय भूमिका

‘तबलिगी जमात’ या सुन्नी मुसलमानांच्या धार्मिक संघटनेवर सौदी अरेबियाने बंदी घातली आहे. ‘जिहादी आतंकवादाच्या प्रवेशद्वारांपैंकी एक’ आणि ‘समाजासाठी धोकादायक’ असा ठपका या संघटनेवर ठेवण्यात आला आहे. या घटनेतून बोध घेऊन सरकार आतातरी तबलिगी जमातवर भारतात बंदी घालणार का ?