शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेण्याची पात्रता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबियांची नाही ! – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे नाव घेऊन ते महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप

गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार

नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवार यांना ‘संघर्ष’ शब्दाचा अर्थ तरी कळतो का ? रोहित पवार यांनी असा कोणता संघर्ष केला आहे की, ते ‘संघर्ष’ नावाचे पुस्तक वाटत आहेत. आज हे लोक शाहू, फुले आणि आंबेडकर यांची पुस्तके वाटत आहेत; मात्र त्यांचे नाव घेण्याची पात्रता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबियांची नाही. ज्या शरद पवार यांनी ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगले, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि अर्थमंत्री होत आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते. त्यांचाच नातू परत आमदार होतो. हे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या कोणत्या पुस्तकात लिहिले आहे ?, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी १९ डिसेंबर या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना केली.

१. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचे वाटप केले. यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांचा खरपूस समाचार घेतला.

२. ते म्हणाले की, इतकी वर्ष जलसंपदा विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता; मात्र ते जत सारख्या दुष्काळी भागाला साधे पाणीही देऊ शकले नाही. मग सीमावादावर बोलायचा त्यांना अधिकार तरी काय आहे ? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनाच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती.

३. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री हा रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष राहील, हे या संस्थेच्या घटनेत लिहिले होते; मात्र शरद पवार यांनी ही घटना पालटली. याचे नेमके कारण काय होते ?

४. पदाचा अपवापर करण्यात पवार कुटुंबीय पुढे आहे. मग कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे का ? फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे नाव घेऊन ते महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करत आहेत. खरे तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणतेही सूत्र शिल्लक राहिलेले नाही.