मुंबई – महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, तसेच बेरोजगारी आदी विविध प्रश्नांविषयी १७ डिसेंबर या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात आला. भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रूडास मिलपासून चालू झालेल्या मोर्च्याची सांगता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या येथे झाली. या मोर्च्यात राज्यभरातून उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड या मार्गाने हा मोर्चा गेला. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत यांसह तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते मोर्च्यात सहभागी झाले होते.
या वेळी अजित पवार यांनीही भाषण केले.
(सौजन्य : ABP MAJHA)
बेळगाव, निपाणी घेऊन संयुक्त महाराष्ट्र केल्याविना रहाणार नाही ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
राज्यपाल हा केंद्रातील व्यक्तींसाठी काम करणारा नसावा, तर जनतेच्या हितासाठी काम करणार असावा. राज्यपाल या पदाला मोठा मान आहे. छत्रपती शिवाजी यांना अवमान करणार्या व्यक्तीला मी राज्यपाल मानत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. फुले दाम्पत्य नसते, तर आपण कुठे असतो, हे एका मंत्र्याने ‘भीक’ शब्द वापरून दाखवून दिले. असे नेत्यांनी म्हणणे हा वैचारिक दारिद्रीपणा होय. अशा लफंग्यांना छत्रपती शिवराय यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अनेकांनी बलीदान दिले आहे. बेळगाव, निपाणी घेऊन संयुक्त महाराष्ट्र केल्याविना आम्ही रहाणार नाही.
… तर महाराष्ट्र पेटून उठल्याविना रहाणार नाही ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
महाराष्ट्रात राज्यकर्त्यांच्या कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या अपकीर्तीची स्पर्धा चालू आहे. महात्मा फुले यांनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठे काम केले, अशा व्यक्तीविषयी राज्यपालांकडून टिंगल-टवाळी होत असेल, तर राज्यपाल म्हणून त्यांना त्या पदावर रहाण्याचा अधिकार नाही. लोक शांत आहेत; पण राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर महाराष्ट्र पेटून उठल्याविना रहाणार नाही.