मोपा विमानतळ आणि ३ आयुष संस्था यांचे लोकार्पण

‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण


पणजी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला धारगळ, पेडणे येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गाझियाबाद येथील राष्ट्रीय युनानी मेडिसीन इन्स्टिट्यूट आणि देहली येथील राष्ट्रीय होमिओपॅथी इन्स्टिट्यूट यांचे ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे लोकार्पण करण्यात आले. या वेळी गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

९ डिसेंबरला चालू झालेल्या ३ दिवसांच्या ‘९ वी जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शन’ यांचा ११ डिसेंबरला समारोप झाला. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते वरील तिन्ही संस्थांचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण करण्यात आलेल्या तिन्ही संस्थांसाठीचा खर्च ९७० कोटी रुपये असून या संस्थांमधून ४०० विद्यार्थ्यांना संबंधित उपचार पद्धतींचे शिक्षण देण्यात येणार आहे, तर तिन्ही ठिकाणी मिळून ५०० खाटांची रुग्णालय सेवा उपलब्ध असेल. पंतप्रधान मोदी यांनी या वेळी आरोग्य प्रदर्शनाची पहाणी केली. ९ व्या जागतिक आयुर्वेद परिषदेत ५० देशांतील ४०० प्रतिनिधी उपस्थित राहिले होते.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘मोपा विमानतळाचे भूमीपूजन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थित झाले होते आणि आता त्यांचे नाव विमानतळाला देण्यात आल्याने माझ्यासाठी आजचा क्षण एक भावनिक क्षण आहे.’’