(म्हणे) ‘केवळ सरस्वतीची पूजा का ?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून पुन्हा एकदा हिंदुद्वेष प्रकट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ

पुणे – सरस्वतीदेवीने किती शाळा काढल्या ? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिले ? (देवतांकडून शिक्षण (ज्ञान) मिळण्यासाठी स्वत:ची तेवढी पात्रता असावी लागते. साधनेविना देवतांकडून ते कसे मिळणार ? – संपादक) जर त्यांनी शिक्षण दिले, तर मग महात्मा फुलेंना का पाऊल टाकावे लागले ? (म. फुले यांनी शाळा काढल्या हा चांगला भाग आहे; मात्र ब्रिटिशांनी भारत पादाक्रांत करण्यापूर्वी भारतात काही सहस्र गुरुकुले होती, याचे उल्लेख आहेत. ब्रिटिशांपूर्वी भारतियांना चांगले शिक्षण मिळत होते, याचा हा पुरावा नाही का ? – संपादक)  ब्राह्मण समाजात केवळ पुरुषांना शिक्षण दिले जायचे; महिलांना शिक्षण देत नव्हते. (असे आहे तर गार्गी, मैत्रेयी यांसारख्या स्त्रिया वेदशास्त्र पारंगत कशा झाल्या ? यावरून केवळ ब्राह्मणद्वेषापोटी छगन भुजबळ असे बोलत आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे काय ? – संपादक) म्हणून मी म्हणतो केवळ सरस्वतीची पूजा का ? त्यामुळे सावित्रीबाई फुलेंना स्थान द्या, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते पुण्यात बोलत होते. छगन भुजबळ यांनी श्री सरस्वतीदेवीवर यापूर्वीही टीका केली होती.

भुजबळ पुढे म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात आता गणपतीचे अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात आणले. उद्या शंकर, पार्वती,३० कोटी देवांचाही अभ्यास चालू करा. बाकीचे शिक्षण बंद करा. हेच शिकत बसले, तर कशा नोकर्‍या लागतील ? हे सगळे मुद्दाम केले जात आहे. याविरोधात आवाज उठवावा लागेल. कुणाची अनुमती नसतांना हा प्रकार चालू आहे. (खरेतर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अन्य धर्मियांना त्यांच्या प्रार्थनास्थळी त्या त्या धर्माचे शिक्षण दिले जाते. मुसलमानांना, ख्रिस्त्यांना त्यांच्या धर्माचे शिक्षण मिळते; पण भारतात हिंदूंना हेतूपूर्वक त्यापासून वंचित ठेवले जाते, ही वस्तूस्थिती आहे. निवळ व्यावहारिक ज्ञान घेतलेली पिढी शिक्षित पिढी व्यसन, आत्महत्या यांना बळी पडतांना दिसत आहे. त्यांच्यात विविध विकृती वाढत आहेत, हे भुजबळ यांना दिसत नाही का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदू सहिष्णू असल्यामुळे वारंवार हिंदु देवतांचा अपमान केला जातो. याविषयी भुजबळ यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करण्यासह देवतांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासाठी हिंदु लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार का ?