पुढील २ दिवसांत काही उद्योग ठप्प होण्याची भीती ! - राज आंब्रे

खेड – लोटे औद्योगिक वसाहत आणि परिसरातील १९ गावांवर सध्या तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. या परिस्थितीमुळे येत्या २ दिवसांत औद्योगिक वसाहतीतील काही उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे, अशी चेतावणी लोटे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी दिली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योग भवन येथे १९ जूनला एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सचिव राजकुमार जैन, संचालक राजेश तिवारी, किसन चव्हाण, तसेच घरडा आस्थापनाचे व्यवस्थापक आर्.सी. कुलकर्णी उपस्थित होते.
राज आंब्रे यांनी सांगितले की,
१. येथील एम्.आय.डी.सी.ने सद्य:परिस्थितीत पाणीपुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे उद्योजकांच्या शिष्टमंडळाने १८ जूनला जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
२. लोटे औद्योगिक वसाहतीतील अनुमाने २० सहस्र कामगार, तसेच कर्मचारी असून त्यांच्या वसाहतींसाठी किमान पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करणे आवश्यक आहे, या समस्येवर ‘जवळील धरणातून टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार’, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले आहे.
३. लोटे औद्योगिक वसाहत कोयना धरणाच्या अवजलावर अवलंबून आहे; मात्र या व्यवस्थेला पर्याय नसल्याने दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
४. वाशिष्ठी नदीवरील फरशी तिठा येथे बंधारा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी २४ कोटी रुपयांचा निधी संमत होऊन ६ वर्षे उलटली, तरी शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याच्या भीतीमुळेही या प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे.
५. सध्याची परिस्थिती कोरोना कालावधीपेक्षाही गंभीर आहे. उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर असून परिसरातील सहस्रो कामगारांच्या रोजगारावर संकट आले आहे.
६. कोळकेवाडी धरणातून जलवाहिनी उभारून वाशिष्ठी नदीलगतच्या औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणार्या विहिरींमध्ये पाणी सोडण्याचा पर्याय शासनाने तातडीने विचारात घ्यावा, तसेच राज्य सरकारने लोटे औद्योगिक वसाहत, खेड तालुका आणि पंचक्रोशीतील गावांवर ओढवलेल्या पाणीसंकटाची गंभीर दखल घेऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
७. लोटे पंचक्रोशीतील गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चालू आहे; मात्र परिसरातील जलस्रोत मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने नागरिकांनाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
घरडा आस्थापनाचे उत्पादन ८० टक्के बंद
घरडा आस्थापनाचे व्यवस्थापक आर्.सी. कुलकर्णी यांनी सांगितले की, पाणीटंचाईमुळे आस्थापनाने सुमारे ८० टक्के उत्पादन बंद केले आहे. केवळ २० टक्के कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यरत ठेवले आहेत. पाण्याच्या स्वतंत्र योजना उभारणे, उद्योगांसाठी सध्या शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरातील विविध कामांचा शुभारंभ आज होणार !
पुणे रेल्वेस्थानकाचा ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध ! – श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे पावसाळापूर्व ‘मॉक ड्रिल’ : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता !
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !