गोव्यात पाणीटंचाईचे कोणतेही संकट नाही !

  • जलस्रोत आणि पिण्याचे पाणी खात्याच्या मंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषदेत ग्वाही !

  • पुढील १० वर्षे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी सरकार सज्ज

पणजी, १९ जून (वार्ता.) – गोवा राज्याला सध्या पाणीटंचाईचे कोणतेही संकट भेडसावत नसून राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती आवश्यकता ओळखून जलस्रोत अन् पिण्याचे पाणी खात्यांनी विविध उपाययोजना आणि नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. येत्या काळात राज्याची जलसाठवणूक आणि वितरण क्षमता दुप्पट केली जाईल, अशी ग्वाही जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि पिण्याचे पाणी पुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेतील काही प्रमुख सूत्रे

१. धरणांची सद्यःस्थिती आणि जलसाठे : सध्या राज्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून किमान १५ दिवस पाऊस पडला नाही, तरीही राज्याला पाण्याचा तुटवडा भासणार नाही. साळावली धरणात सर्वाधिक म्हणजे जवळपास ६० दिवसांचा (२ महिन्यांचा) जलसाठा उपलब्ध आहे. अंजुणे धरणात २५ दिवसांचा, तर पंचवाडी धरणात २० दिवसांचा जलसाठा शिल्लक आहे.

२. पाणीवापरावर निर्बंध आणि पर्यायी व्यवस्था : वाहने धुणे आणि बागांना मोठ्या प्रमाणात पाणी घालणे, यांवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या काळात धारबांदोडा येथील खाणींच्या खड्ड्यांत साचलेल्या पाण्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.

३. पायाभूत सुविधांचा विकास आणि नवीन प्रकल्प : अनुमाने १ सहस्र २०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या ४० वर्षांहून जुन्या आहेत. यामुळे पाण्याची मोठी गळती होते. या जुन्या वाहिन्या पालटण्यासाठी १ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून तो ३-४ वर्षांत पूर्ण होईल. येत्या वर्षभरात ३२५ एम्एल्डी (मिलियन लिटर्स) क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जातील. यामुळे एकूण क्षमता १ सहस्र एम्एल्डीच्या पुढे जाईल.

४. पाऊस व्यवस्थित चालू झाल्यानंतर नवीन बोअरवेल्स खोदण्यावर निर्बंध आणले जातील. त्याचप्रमाणे सध्या निरुपयोगी ठरलेल्या जुन्या बोअरवेल्सचे पुनर्भरण केले जाईल.

नागरिकांच्या पाण्याच्या समस्या आणि जलवाहिन्या गळतीच्या तक्रारी सोडवण्यासाठी सरकारने नवीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

नागरिकांना तक्रार करण्यासाठी ७०३००५५१३६ आणि ७०३००५५०३६ हे हेल्पलाईन (साहाय्यता) क्रमांक २४ घंटे चालू करण्यात आले आहेत. सध्या काही ठिकाणी जाणवणारी किरकोळ पाणीटंचाई ही केवळ जलवाहिनी फुटल्याने किंवा तांत्रिक कारणांमुळे आहे. राज्यात पाण्याची कोणतीही मोठी समस्या नाही. सरकारने पुढील १० वर्षांचे नियोजन केले असून नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा वापर दायित्वाने करावा, असे आवाहन मंत्र्यांनी केले आहे

आमदार रेजिनाल्ड यांचे आवाहन पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने सर्वत्रची बांधकामे स्थगित करा !

मडगाव – राज्यात अद्याप पावसाला प्रारंभ झालेला नाही. जलसाठ्यांतील पाणीही अल्प झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ शकते. यामुळे कोरोना महामारीपेक्षाही धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. पाणी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आणि नगरनियोजन मंत्री यांनी तात्काळ सर्व बांधकामे स्थगित करावीत, अशी विनंती कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली आहे.