महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !

मुंबई – मध्यंतरी ‘नीट’च्या परीक्षेच्या संदर्भात घडलेले गैरप्रकार पहाता राज्य परीक्षा परिषदेने यंदापासून महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेच्या परीक्षार्थींसाठीचे नियम कठोर केले आहेत. परीक्षार्थींना केंद्रावर बुरखा, मास्क किंवा टोपी घालण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परीक्षेला जातांना आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र यांपैकी एकाची मूळप्रत समवेत ठेवावी लागणार आहे.

परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याआधी परीक्षार्थी आणि कर्मचारी यांचे मेटल  डिटेक्टरच्या (धातूशोधक यंत्राच्या) साहाय्याने अंगझडती घेण्यात येईल. परीक्षार्थींची हँड हेल्ड मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने पडताळणी केली जाणार आहे. परीक्षार्थींचे ‘फेस रिकग्नीशन’ (चेहरा ओळखणे) केले जाईल. संशयित परीक्षार्थींची आधार पडताळणीही केली जाईल. परीक्षा केंद्रात मूळ विद्यार्थ्यांऐवजी अन्य परीक्षार्थींनी प्रवेश केल्याचे आढळल्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे. परीक्षा केंद्र आणि परिसर, तसेच परीक्षा दालनातील सीसीटीव्ही हे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत.

संपादकीय भूमिका

परीक्षेसाठी कठोर निर्बंध घालण्यासह शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता सुधारण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत !