मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड नीलेश गडदेकडून २ गावठी पिस्तूल जप्त !

  • वेदांत बंडगर हत्या प्रकरण

  • निष्काळजीपणाबद्दल जत पोलीस निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

कुख्यात गुंड नीलेश गडदे

सांगली – जिल्ह्यातील जत येथील वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कुख्यात गुंड नीलेश विठोबा गडदे याच्याकडून पोलिसांनी २ गावठी पिस्तूल जप्त केले आहेत. पोलीस कोठडीत चालू असलेल्या चौकशीत जप्त केलेल्या पिस्तुलांपैकी एका पिस्तुलातूनच त्याने वेदांतवर गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी अतुल वायदंडे याला अटक करण्यात आली असून पसार असणारे किरण लोखंडे आणि विशाल चौगुले यांच्यासह अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

या प्रकरणातील आणखी एक संशयित सागर उपाख्य नानासो चौगुले (रा. अग्रण धुळगाव) याने पोलिसांच्या भीतीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. रुग्णालयातून सुटका होताच त्याला अटक केली जाईल.

जतच्या पोलीस निरीक्षकांना कारणे ‘दाखवा नोटीस’ !

या गोळीबार प्रकरणाची गंभीर नोंद घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्यांना ८ दिवसांत यावर खुलासा सादर करावा लागणार आहे.