सोमालियन सैन्याच्या हवाई आक्रमणात १०० आतंकवादी ठार !

शबेले (सोमालिया) – येथे सोमालियन सैन्याने केलेल्या हवाई आक्रमणात ‘अल्-शबाब’ या आतंकवादी संघटनेचे १०० आतंकवादी ठार झाले. यामध्ये १२ म्होरक्यांचा समावेश होता. ठार झालेल्या सर्व आतंकवाद्यांकडून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ‘अल्-शबाब’ या संघटनेचा उद्देश ‘वर्ष २०१७ मध्ये स्थापन झालेल्या सोमालियन सरकारला उखडून टाकणे’, हा आहे. त्यासाठी या संघटनेच्या आतंकवाद्यांनी ४ मासांत ३ मोठी आक्रमणे केली आहेत. त्यात एकूण ३६ जण ठार, तर ७९ जण घायाळ झाले होते.

या कारवाईविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सोमालिया सरकारचे मंत्री अब्दिरहमान युसूफ अल्-अदाला म्हणाले, ‘‘अल्-शबाब’च्या आतंकवाद्यांकडून सरकारी अधिकारी आणि सैनिक यांच्यावर मोठे आक्रमण केले जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर हवाई आक्रमण केले. आमचे लष्कर आणि गुप्तचर विभाग लोकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलत आहेत. शबेले भागात सैनिकी कारवाई चालू करण्यात आली आहे.’’

संपादकीय भूमिका

भारतानेही जम्मू-काश्मीर आणि इतर भागांतील आतंकवाद्यांवर अशीच धडक कारवाई करणे अपेक्षित !