सीमेवर लढणार्या सैनिकांना अर्थसाहाय्य करण्यासह सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड !
पुणे – रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमांतून स्वतःच्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७ वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. २६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अंतिम श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या १७ दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.
दातृत्वाचा मानदंड
अभिनय क्षेत्रात हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचे घर असावे, या उद्देशातून विक्रम गोखले यांनी स्वत:ची जागा ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’ला देऊन दातृत्वाचा मानदंड प्रस्थापित केला. यासह ज्येष्ठ अभिनेते आणि वडील चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेतांना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाहाय्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत चालू ठेवली.
Maharashtra | Veteran Actor Vikram Gokhale passes away in Pune.
(File Pic) pic.twitter.com/bnLFbRyYnm
— ANI (@ANI) November 26, 2022
वर्ष २०१३ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
वर्ष २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी विक्रम गोखले यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वर्ष २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने, तर ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले होते.
अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रबोधनात्मक विचार
१. ज्या योद्धयांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मोठ्या नेत्यांनी केला नाही. आपले लोक ब्रिटिशांविरुद्ध लढत आहेत, हे पाहूनही त्यांनी वाचवले नाही.
२. देशाचा इतिहास बाबरापासून चालू होत असल्याचे छापले जाते, हे दुर्दैव आहे. हा देश कधीही हिरवा होणार नाही, तो भगवाच राहिला पाहिजे !
३. ‘या देशाचे तुकडे तुकडे झाले पाहिजेत’, असे म्हणणार्यांना गोळ्या घाला !