अभिव्यक्तीचा बाजार !

Thank you Elon Musk, I’m Back !!!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते पुन्हा चालू झाले आहे. ट्रम्प यांनी चिथावणीखोर ट्वीट केल्याचे सांगत त्यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले होते. ‘ट्रम्प यांचे ट्विटर खाते पुन्हा चालू करावे का ?’, याविषयी ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरवर चाचणी घेतली होती. त्यात ५१.८ टक्के लोकांनी ‘ट्रम्प यांचे खाते पुन्हा चालू करावे’, असे मत दिले. त्यानंतर ट्रम्प यांचे खाते चालू करण्यात आले. हे एकाअर्थी बरे झाले; कारण ट्विटरला जिहादी आतंकवादी, धर्मांध, हिंदुद्वेष्टे, अतीकडवे विचारसरणीचे लोक चालतात. त्यांनी ट्विटरवरून काहीही बरळले, तरी ते खपवून घेतले जाते, मग हाच न्याय ट्रम्प यांना का दिला गेला नाही ? असो. आता ट्विटर आस्थापनात ‘नवा गडी नवे राज्य’ चालू झाले आहे. त्यामुळे ट्विटरची धोरणे पालटणार, हे निश्चित ! ‘नकारात्मक आणि द्वेषमूलक ट्वीट हटवण्याचे मस्क यांनी सुतोवाच केले आहे. ‘असे किती प्रमाणात होईल ?’, हेही पहावे लागेल. प्रथम ‘ट्विटर आस्थापन चालू राहील का ?’, हा सध्या चर्चेचा विषय आहे. ‘हो-नाही’ करत मस्क यांनी ट्विटर आस्थापन कह्यात घेतले. त्यानंतर त्यांनी ३ सहस्रांहून अधिक कर्मचार्‍यांना काढले. ‘वर्क फ्रॉम होम’वर बंदी घालून अधिक काळ काम करण्याची सिद्धता बाळगा’, असे मस्क यांनी घोषित केल्यावर आस्थापनातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी समूहाने त्यागपत्र देण्यास आरंभ केला. त्यामुळे ट्विटरचे भविष्य सध्यातरी अंधारमय वाटत आहे. हे आस्थापन कह्यात घेतल्यावर या सामाजिक माध्यमांत आमूलाग्र पालट करणार असल्याचे मस्क यांनी सूचित केले होते; मात्र तो पालट करण्यासाठी त्यांनी आस्थापनात सक्षम अधिकारी-कर्मचार्‍यांचे सहकार्य लागेल. दुर्दैवाने तरी सध्या उलट चित्र दिसून येत आहे. मस्क यांच्या विरोधात अधिकारी-कर्मचार्‍यांनी दंड थोपटल्याने मस्क यांनीही थोडे नरमाईने घेण्याची भूमिका घेतली आहे. ‘ट्विटर बंद पडले, तर काय होईल ?’, असा प्रश्न ट्विटर वापरकर्त्यांना पडू शकतो. त्यामुळे काही आकाश फाटणार नाही. सकाळी उठल्यापासून टिवटिवाट करणार्‍यांना मात्र करमणार नाही, हेही तितकेच खरे. ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य एका विशिष्ट समूह आणि गट यांना बहाल करणारी, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराला प्रोत्साहन देणारी आणि खोटी वृत्ते प्रसारित करणारी ट्विटरसारखी सामाजिक माध्यमे समाजासाठी घातक नाहीत का ?’, याचा सारासार विचार करण्याची वेळ समाजधुरिणांवर आली आहे.

अभिव्यक्तीच्या माध्यमातून अर्थार्जन !

जसा काळ लोटत गेला, तशी जगभरात लोकशाहीची व्याख्याही पालटत गेली. अनेक पुढारलेल्या आणि विकसित राष्ट्रांमध्ये लोकशाहीचा केंद्रबिंदू म्हणून अभिव्यक्तीस्वातंत्र्याकडे पाहिले जाते. याच अनुषंगाने कुणाचीही भीती न बाळगता स्वतःला व्यक्त करत रहाणे, याकडे समाजाचा कल वाढला. अमेरिका किंवा अन्य पाश्चात्त्य देशांतील पुढारलेल्या समाजात व्यक्त होणे, याला पुष्कळ महत्त्व दिले गेले. सध्या तर अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे स्तोम वाढले आहे. विचारांना मोकळी वाट करून देण्यासाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारखी सामाजिक माध्यमे चालू झाली. व्यक्त होण्यात कुणाला काहीच अडचण असू नये; मात्र व्यक्त होण्यात शिष्टाचार हवाच. ‘त्यातही स्वतःच्या विचारांना मोकळी वाट करून देतांना ते विचार समाजाला घातक तर नाहीत ना ?’, हे कुणी ठरवायचे ? त्याही पुढे जाऊन अभिव्यक्तीस्वातंत्र्य सर्वांना सारखे कसे असू शकते ? उदाहरणार्थ जिहादी आतंकवाद्यांना आणि ते ज्या समाजाला पीडा देतात, त्या समूहातील लोकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य सारखे कसे असू शकते ? जिहादी आतंकवादी, धर्मांध, समाजकंटक यांना अभिव्यक्तीची मोकळीक दिली, तर त्याचा त्रास समाजाला भोगावा लागतोच. आताही तेच होत आहे. अशांना मोकळीक असल्यामुळे सामाजिक माध्यमांद्वारे वैचारिक आतंकवादाला कुठेतरी खतपाणी घातले जात आहे; मात्र ही सामाजिक माध्यमे ज्यांच्याकडून चालवली जातात, त्यांच्याकडे याचा उपाय नाही किंवा त्यांना त्यावर उपाय काढायचा नाही. या सर्वांचा सारासार विचार करता अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा जो बाजार मांडला आहे, त्याचा वैचारिक विरोध व्हायलाच हवा.

सत्य मांडणे आवश्यक !

व्यक्त केलेले विचार हे दोन प्रकारचे असतात, चुकीचे किंवा योग्य ! अभिव्यक्तीच्या हव्यासापायी चुकीच्या, असत्य आणि लोकांना भ्रमित करणार्‍या विचारांचे प्रसारण हे थांबवायलाच हवे. सामाजिक माध्यमे यासाठी काही प्रयत्न करत नाहीत. अशा चुकीच्या आणि चिथावणीखोर विचारांचे प्रसारण करणार्‍यांना अभय दिले जाते, तर त्याला विरोध करणार्‍यांना ‘ब्लॉक’ केले जाते. हे लक्षात घेता ट्विटरला घरघर लागल्यास त्याविषयी हळहळत बसण्याचे काही कारण नाही; कारण सामाजिक माध्यमांद्वारे समाजस्वास्थ्यच जर बिघडत असेल, तर ती बंद पडलेलीच बरी.

विचारांना मोकळी वाट करून दिल्यामुळे माणसाला हलकेपणा जाणवतो, हा मानसशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे. त्यामुळे स्वतःवर किंवा स्वतःच्या समूहावर झालेल्या अन्याय, अत्याचार यांना वाचा फोडण्यासाठी किंवा एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी कुणी अशा माध्यमांवर व्यक्त होत असेल, तर ते स्वागतार्ह आहे; मात्र या व्यासपिठाचा वापर योग्य आणि समाजाभिमुख व्यक्तींकडून होत आहे ना, याची निश्चिती कोण देणार ? सद्यःस्थिती पहाता समाजाच्या उत्कर्षासाठी सत्यनिष्ठ आणि विवेकनिष्ठ विचारांचा प्रसार सामाजिक माध्यमांद्वारे होणे आवश्यक आहे.

ट्रम्प यांचे ट्विटर खाते बंद केल्यावर त्यांनी ‘ट्रूथ सोशल’ नावाचे स्वतःच्या मालकीचे सामाजिक माध्यम चालू केले. त्यामुळे सध्या तरी ते ‘ट्विटर’वर परतण्यास उत्सुक नाहीत. समाजाचा उत्कर्ष व्हावा, याची आत्यंतिक तळमळ असणार्‍या समूहाने एकत्रित येऊन सत्याची कास धरणार्‍या अशा सामाजिक माध्यमाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्यासाठी पुढे येणे अपेक्षित आहे !

समाजविघातक विचारसरणीच्या लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी सामाजिक माध्यमे बंद करणे आवश्यक !