आतंकवाद पूर्णपणे संपवत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार

नवी देहली – जर आपल्याला नागरिकांना सुरक्षित ठेवायचे असेल, तर आतंकवाद आपल्या घरापर्यंत येईपर्यंत आपण थांबू शकत नाही. आपण आतंकवाद्यांची माहिती मिळवत त्यांचा शोध घेतला पाहिजे, त्यांचे जाळे नष्ट केले पाहिजे आणि त्यांचा आर्थिक पुरवठा रोखला पाहिजे. प्रत्येक आक्रमण हे अनेकांवर होणारे आक्रमण आहे, असे आम्ही मानतो. एका व्यक्तीचा जीव हा आमच्यासाठी अनेकांच्या समान आहे. त्यामुळे जोपर्यंत आतंकवाद पूर्णपणे संपवत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला.

येथे ‘नो मनी फॉर टेरर’ (आतंकवादाला अर्थपुरवठा नाही) या विषयावर आयोजित परिषेदत ते बोलत होते. ‘आतंकवादाला होणारा आर्थिक पुरवठा’, हाच या परिषदेचा मुख्य विषय होता.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की,

१. ज्या संस्था आणि व्यक्ती आतंकवाद्यांविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना वेगळे केले पाहिजे.

२. काही देश आपल्या विदेशी धोरणाचा भाग म्हणून आतंकवादाला पाठिंबा देतात. ते राजकीय, तसेच आर्थिक पाठिंब्याचे आश्‍वासन देतात. अशा देशांना दंड करण्याची आवश्यक आहे.

३. भारताला गेली अनेक दशके आतंकवादाचा फटका बसला आहे. प्रत्येक वेळी आपण मोठ्या धीराने सामना केला आहे.

_______________________________ 

संपादकीय भूमिका

भारतातील जिहादी आतंकवाद हा पाकिस्तानने निर्माण केला आहे, जोपर्यंत भारत त्याला संपवत नाही, तोपर्यंत भारतातील जिहादी आतंकवाद आणि भारतातील पाकप्रेमींची जिहादी मानसिकता संपणार नाही, हेही तितकेच सत्य आहे !