संभाजीनगर, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – समस्त धर्मप्रेमी व्यक्ती संघटित होऊन ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियान’ राबवत आहेत. या अंतर्गत प्रत्येक गावात जागृती करून शनिवारी सायंकाळी सामूहिक हनुमानचालिसा पठण करण्यात येते. या उपक्रमास २१ सप्ताह पूर्ण झाल्याने ग्रामस्तरावरील समन्वयकांना दिशादर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम सिल्लोड येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात घेण्यात आला. या वेळी ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, व्यावसायिक श्री. प्रशांत चिनके, श्री. कमलेश कटारिया आदी उपस्थित होते.
हिंदूंनो, हिंदु राष्ट्रासाठी कृतीप्रवण व्हा ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्र स्थापनेचे मूळ समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेल्या बलोपासनेत आहे. मन, मेंदू आणि मनगट मजबूत करण्यासाठी बलोपासना आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी गावोगावी हनुमंताच्या मंदिरांची उभारणी केली. पूर्वी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश होता; मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. राजकीय स्वार्थ साधणार्या अनेक शासनकर्त्यांनी देशाची व्यवस्थाच हिंदुविरोधी केली आहे. येथे न्याय, बंधुता आणि समता केवळ अल्पसंख्यांक समाजाला लागू आहे. हिंदूंना मात्र केवळ कायदे दाखवले जातात. त्यामुळे व्यवस्था आदर्श करणे हे क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीप्रवण व्हा !
हिंदु धर्मावर होणार्या आघातांविषयी निर्भीडपणे जागृती करणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, संभाजीनगर
कुठलेही साहाय्य नसतांना हिंदु धर्मावरील आघातांविषयी निर्भिडपणे जागृती करणारे एकमेव दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय. देशात सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदूंच्या प्रथा, परंपरा यांना डावलण्याचे षड्यंत्र पद्धतशीरपणे रचले जात आहे. हिंदु राष्ट्राचे सूत्र अतिशय प्रभावीपणे मांडण्याचे काम हिंदु जनजागृती समिती करत आहे.