अमेरिकेत एका दशकात झाल्या ४५० राजकीय हत्या

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेमध्ये ‘अँटी डिफेमेशन लीग’ने केलेल्या अभ्यासानुसार गेल्या एक दशकात ४५० राजकीय हत्या झाल्या आहेत. यांपैकी ७५ टक्के, म्हणजे ३३७ हत्या उजव्या विचारसरणीच्या कट्टरतावाद्यांनी, तर ४ टक्के हत्या डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावाद्यांनी केल्या आहेत. नुकतेच अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील घरावरही आक्रमण करण्यात आले. यात नॅन्सी यांचे पती पॉल पेलोसी यांच्या डोक्यावर हातोड्याने आक्रमण करण्यात आली. आक्रमणकर्ता नॅन्सी यांनाच मारण्यासाठी आला होता; पण त्याआधीच पॉल यांच्याशी त्याची झटापट झाली. या घटनेच्या वेळी नॅन्सी घरात नव्हत्या.

१. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१७ मध्ये संसदेच्या सदस्यांवर धमक्यांची अनुमाने ३ सहस्र ९३९ प्रकरणे समोर आली होती. वर्ष २०२१ मध्ये या आक्रमणांच्या संख्येत तिप्पट वाढ होऊन ती ९ सहस्र ६२५ इतकी झाली.

२. खासदारांवरील वाढती आक्रमणे लक्षात घेऊन पोलिसांनी संरक्षणासाठी खर्च होणार्‍या रकमेमध्ये वाढ केली होती. ही रक्कम प्रत्येक खासदारासाठी ८ लाख २३ सहस्र रुपयांनी वाढवण्यात आली. संसदेचे ४३५ सदस्य आहेत. ते घरून राजधानी वॉशिंग्टनला जात असतात. त्यांच्यासमवेत २४ घंटे सुरक्षारक्षक असतात.

३. या वर्षीही धमक्यांच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या ३ मासांतच पोलिसांनी अशा १ सहस्र ८०० हून अधिक गुन्ह्यांची नोंद केली आहे. तज्ञांच्या मते यामागे नेत्यांची चिथावणीखोर भाषणे, हे मोठे कारण आहे.

संपादकीय भूमिका

भारताला आणि अन्य विकसनशील देशांना उपदेशांचे डोस पाजणार्‍या अमेरिकेत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, हेच यातून लक्षात येते !