नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – भगवान श्री दत्तात्रेय यांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी कृष्णा-पंचगंगा या नद्यांच्या संगमस्थानी औदुंबर वृक्षाखाली वर्ष १४२२ ते १४३४ अशी १२ वर्षे तप:श्चर्या केली. त्यानंतर गाणगापूर येथे प्रयाण करण्यापूर्वी जनकल्याणाच्या हेतूने याच औदुंबर वृक्षाखाली स्वहस्ते श्रीपादुका स्थापन केल्या. यानंतर सेवेकरी समस्त पुजारी परिवाराचे मूळ पुरुष श्री भैरम् भटजी यांना या पादुकांची तीन त्रिकाळ पूजा करण्यासाठी आज्ञा देऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामीजींनी गाणगापूरला प्रयाण केले. या वर्षी गुरुद्वादशीला म्हणजे २२ ऑक्टोबरला या श्रीपादुका पूजनाला ५८८ वर्षे पूर्ण झाली.
प.प. श्री टेंबे स्वामी, श्री नारायण स्वामी, मौनी स्वामी, प.पू. नाना महाराज तराणेकर, प.पू. भक्तराज महाराज, विविध पिठांचे शंकराचार्य, तसेच अनेक साधू-संत आणि आध्यात्मिक अधिकारी असलेल्या उन्नतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्रीक्षेत्रात आजही अखंडपणे सेवा, व्रतवैकल्ये, विधी आणि नित्य नैमित्तिक धर्मकर्तव्ये करण्यासाठी अनेक जण येतात.