सेऊल (दक्षिण कोरिया) येथे हॅलोविन उत्सवात चेंगराचेंगरी : १५१ जणांचा मृत्यू

सेऊल (दक्षिण कोरिया) – दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे २९ ऑक्टोबरच्या रात्री हॅलोविन उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १५१ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर १५० हून अधिक जण घायाळ झाले. अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू आला. या अपघातामुळे देशात राष्ट्रीय शोक घोषित करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या उत्सवाच्या वेळी लाखो लोक एका अरुंद रस्त्यावर आले होते. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.

हॅलोविन म्हणजे काय ?

अमेरिका, इंग्लंड आणि अन्य काही देशांत प्रतिवर्षी ३१ ऑक्टोबर या दिवशी ‘हॅलोविन’ नावाचा एक उत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी पृथ्वी आणि भुवलोक यांतील अंतर अल्प होते. त्यामुळे भुवलोकातील पितर पृथ्वीवर येतात. पितरांनी स्वतःच्या नातलगांना ओेळखू नये; म्हणून हे लोक भूत, प्रेत, चेटकीण, पिशाच्च, राक्षस यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी तसे विचित्र पोषाख घालतात. स्वतःच्या घरांच्या प्रवेशद्वारांवरही अशीच भयानक आणि विकृत सजावट करतात. या दिवशी केेलेल्या खाद्यपदार्थांनाही भुता-प्रेतांचे आकार दिलेले असतात.