(म्हणे) ‘माझ्या नातीला विवाह न करताही आई व्हायचे असेल, तरी मला त्याचे काही वाटणार नाही !’

ज्येष्ठ अभिनेत्री तथा समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचे समाजविघातक विधान

मुंबई – कोणत्याही संबंधांमध्ये (‘रिलेशनशिप’मध्ये) शारीरिक आकर्षण फार आवश्यक असते. संबंध हे केवळ प्रेम, स्वच्छ हवा आणि सामंजस्य यांवर असू शकत नाहीत. माझी नात नव्या नवेली हिला जर विवाह न करताही आई व्हायची इच्छा असेल, तरी मला त्याचे काही वाटणार नाही, असे अनैतिकतेला प्रोत्साहन देणारे विधान बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तथा समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी केले. त्या त्यांची नात नव्या नवेली हिच्यासमवेत एका ऑनलाईन कार्यक्रमाला संबोधित करतांना बोलत होत्या.

जया बच्चन पुढे म्हणाल्या की,

१. माझे हे बोलणे लोकांना आक्षेपार्ह वाटेल; परंतु शारीरिक आकर्षण आणि एकमेकांना अनुरूप असणे, हे कोणतेही नाते पुढे जाण्यासाठी अत्यंत आवश्यक असते.

२. आमच्या काळामध्ये असे प्रयोग करता येत नव्हतेे; परंतु आजची पिढी हे सर्व करू शकते आणि त्यांनी तसे का करू नये ? यानेच तर नाती पुढे चालू शकतात. जर शारीरिक संबंध नसले, तर नाते अधिक काळ चालू शकणार नाही.

३. जर तुमच्यामध्ये शारीरिक संबंध असतील आणि त्यानंतरही तुम्हाला वाटत असेल की, हे नाते अधिक काळ नाही चालू शकणार, तर तुम्ही गोष्टी पालटू शकता.

४. आजकालच्या नात्यांमध्ये भावना आणि प्रेम यांचा अभाव असतो. मला असे वाटते की, तुम्हाला तुमच्या सर्वांत चांगल्या मित्राशी विवाह करायला हवा.

संपादकीय भूमिका

  • समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यात हिंदु धर्मात सांगितलेल्या विवाह संस्काराचे अनन्यसाधारण योगदान आहे. हिंदु धर्माने जगासमोर पातिव्रत्याचा महान आदर्श ठेवला असतांना बच्चन यांचे विधान हिंदुद्रोहीच !
  • आजची तरुण पिढी बॉलिवूडच्या कलाकारांना आदर्श मानते. त्यामुळे चंगळवाद आणि स्वैराचार यांना प्रोत्साहन देणार्‍या जया बच्चन यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईच व्हायला हवी !