हिंदूंनी जागृत होऊन हलालवर कायमचा बहिष्कार घालावा ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून दादर, वाशी आणि पनवेल येथे ‘हलालमुक्त दिवाळी’ आंदोलन !

दादर येथे आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

दादर/वाशी/पनवेल, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – मॅकडोनाल्ड, के.एफ्.सी., बर्गरकिंग, पिझ्झा हट ही नामवंत आस्थापने हिंदु, जैन, शीख अशा गैर-मुस्लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकत आहेत. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुसलमान देशांच्या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल सर्टिफाईड’ होऊ लागली आहेत. हाच पैसा गैरमार्गाने इस्लामी आतंकवादासाठी वापरल्याची माहितीही आहे. याविरोधात एकत्र येत हलाल प्रमाणपत्राच्या सक्तीला आता हिंदूंच्या बहिष्काराचा झटका दाखवण्याची वेळ आली आहे, असे परखड वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले.

वाशी येथील सेक्टर १७ च्या मॅकडोनाल्डसमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘हलालमुक्त दिवाळी’ आंदोलन केले. यात हिंदु जनजागृती समितीसह बजरंगदल, योग वेदांत सेवा समिती, गंगासागर फाऊंडेशन (नेरूळ), सनातन संस्था आदी संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते. पनवेल येथील आंदोलनात गायत्री परिवाराचे श्री. पी.के. शर्मा, दिघाटी गावाचे उपसरपंच श्री. रोहिदास शेडगे आणि खोपोली येथील ‘कट्टर हिंदु ग्रुप’चे युवा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर मॅकडोनाल्ड आणि के.एफ्.सी.च्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. दादर (पू.) रेल्वे स्थानकाच्या बाहेरही असेच आंदोलन झाले.

पनवेल येथे मॅकडोनाल्डच्या व्यवस्थापकांनी आंदोलनाला विरोध केल्यावर पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांची बाजू घेत केलेले सहकार्य !

आंदोलनाच्या वेळी मॅकडोनाल्डच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या उपाहारगृहासमोर आंदोलन करण्यास विरोध दर्शवला; पण पोलिसांनी त्यांना ‘आंदोलन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तुम्ही त्यांना रोखू शकत नाही’, अशा पद्धतीने जाणीव करून देत आंदोलनाला सहकार्य केले.

हलाल प्रमाणपत्राची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही ! – सुमित व्यवहारे, माजी बजरंगदल प्रमुख, नवी मुंबई

भारतातील १५ टक्के मुसलमान समाजासाठी ८० टक्के हिंदु समाजावर केली जाणारी हलालच्या उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. आम्हालाही आमचे धर्मस्वातंत्र्य असून झटका पद्धतीचेच उत्पादन हवे आहे. हे या आस्थापनांनी लक्षात ठेवावे.

क्षणचित्रे

१. दोन पंजाबी नागरिकांनी आंदोलन पाहून ‘झटका पद्धत’ योग्य असल्याचे सांगून करत असलेल्या जागृतीविषयी कौतुक केले.

२. ‘झटका’ आणि ‘हलाल’ यांच्यातील भेद बंदोबस्तासाठी उपस्थित असणार्‍या ४-५ पोलिसांनीही उत्सुकतेने जाणून घेतला.

३. वाशी येथे मॅकडोनाल्डचे व्यवस्थापक प्रदीप सणस यांनी स्वतः आंदोलनस्थळी येत आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेत निवेदन स्वीकारले.