चित्रपटावर स्थगिती आणण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय तो प्रदर्शित केलेल्या दिनांकानंतर करणार सुनावणी !

‘थँक गॉड’ या आगामी चित्रपटातून हिंदूंच्या ‘चित्रगुप्त’ या देवतेचे विडंबन केल्याचे प्रकरण

नवी देहली – अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या आगामी चित्रपटातून हिंदूंच्या ‘चित्रगुप्त’ या देवतेचे विडंबन करण्यात आल्याने त्याच्या प्रदर्शनावर स्थगिती आणणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शनाचा दिनांक २५ ऑक्टोबर असून याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यात यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने ‘त्यावर त्वरित सुनावणी करता येणार नाही’, असे सांगत १ नोव्हेंबरला सुनावणी करणार असल्याचे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उदय उमेश लळित आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपिठासमोर प्रविष्ट केलेल्या याचिकेमध्ये चित्रपट प्रदर्शनावरील स्थगितीसमवेतच चित्रपटाचे ‘ट्रेलर्स’ आणि फलक हे सर्व सामाजिक माध्यमांतून काढून टाकण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने १ नोव्हेंबर ही सुनावणीची दिनांक असल्याचे सांगितल्यानंतर याचिकाकर्त्याच्या अधिवक्त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या याचिकेला काहीच अर्थ रहाणार नाही, असे म्हटले. त्यावर न्यायालयाने म्हटले की, याचिकेवर नंतरच सुनावणी करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

  • या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाला काय म्हणायचे आहे, हे सर्वसाधारण जनतेला स्पष्ट व्हायला हवे !