‘अल्ट न्यूज’च्या हिंदुद्वेष्ट्या सहसंस्थापकांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेच नाही ! – ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनी

हिंदुद्वेष्ट्या ‘टाइम’ नियतकालिकाचा खोटारडेपणा उघड !

टाइम नियतकालिकाने सहसंस्थापक हे पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याचे केले होते घोषित !

नवी देहली – जागतिक स्तरावर सर्वश्रेष्ठ समजला जाणारा नोबेल पुरस्कार घोषित करण्याच्या सप्ताहाचा आज शेवटचा दिवस आहे. शांततेसाठी हा पुरस्कार बेलारूस देशाचे मानवाधिकार कार्यकर्ते एलेस बियालियात्स्की, रशियन मानवाधिकार संघटना स्मारक आणि नागरी स्वातंत्र्याचे युक्रेनियन मानवाधिकार संघटना केंद्र यांना संयुक्तरित्या प्रदान करण्यात आला. अशातच या पुरस्कारासाठी हिंदुद्वेष्ट्या ‘अल्ट न्यूज’ या भारतीय वृत्तसंकेतस्थळाचे सहसंस्थापक प्रतिक सिन्हा आणि महंमद जुबैर हे प्रबळ दावेदार असल्याची बातमी प्रसृत करण्यात आली होती; परंतु ती धादांत खोटी असल्याचे आता समोर आले आहे.

‘टाइम्स नाऊ’ या भारतातील इंग्रजी वृत्तवाहिनीने हा भांडाफोड केला असून तिने सांगितले की, ‘टाइम’ नियतकालिकाने ४ ऑक्टोबर या दिवशी सिन्हा आणि जुबैर यांच्या नावांचा उल्लेख करून नोबेल पुरस्कारासाठी ते प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले होते. यावर ‘टाइम्स नाऊ’ने नोबेल पुरस्कार निर्धारित करणार्‍या नॉर्वेजियन समितीला पत्र लिहून यासंदर्भात विचारणा केली. यावर समितीने कळवले की, पुरस्कारासाठी नामांकित केलेल्या उमेदवारांपैकी ‘प्रबळ दावेदार’ अशा प्रकारे समिती कधीच भाष्य करत नाही, तसेच नामांकित केलेल्यांची नावे ५० वर्षांनंतर उघड करण्यात येतात. तोपर्यंत कोणत्याच प्रसारमाध्यमाला अथवा नामांकित केलेल्या उमेदवारांनाही त्यांची नावे आहेत कि नाहीत, हे ठाऊक नसते. त्यामुळे अशा प्रकारे बातम्या प्रसारित करणे, हे केवळ अंदाज व्यक्त करण्याचे प्रकार आहेत.

‘टाइम्स नाऊ’ने म्हटले की, ‘टाइम’ नियतकालिकाने त्याचे म्हणणे मांडण्यासाठी तीन स्रोतांचा उल्लेख केला. त्यामध्ये ‘रॉयटर्स’ या जागतिक वृत्तसंस्थेच्या अहवालाचा उल्लेख आहे, परंतु त्यात सिन्हा आणि जुबैर यांचा नामोल्लेखही नाही. दुसरे स्रोत हे सट्टेबाजीतील अनुमानांवर आधारित होते. त्यातही या दोघांची नावे नव्हती. तिसरे स्रोत ही नॉर्वेतील ‘पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ऑस्लो’च्या संचालकांची खासगी सूची होती. अर्थात् पुरस्कार देण्याच्या निर्णयामध्ये या संचालकांची कोणतीही भूमिका असत नाही. तसेच संचालक हेनरिक उर्दाल यांनी सिन्हा आणि झुबैर यांचा केवळ ओझरता उल्लेख केला होता. त्यांच्या शिफारसींच्या सूचीमध्ये त्यांच्या नावांचा कोणताच उल्लेख नव्हता. (यातून ‘टाइम’ नियतकालिकाने हिंदुद्वेषी अजेंडा (धोरण) राबवणार्‍यांचे उदात्तीकरण करण्यासाठीच हे कुभांड रचले होते, हे स्पष्ट झाले. अशा नियतकालिकांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे काळाची आवश्यकता ! – संपादक)

संपादकीय भूमिका

भारत आणि हिंदू यांचा वारंवार द्वेष करणार्‍या ‘अल्ट न्यूज’चे उदात्तीकरण करणार्‍या ‘टाइम’ नियतकालिकावर आता भारतात बंदीच लादली पाहिजे !