नाकाचे आजार आणि त्यांची चिकित्सा !

‘मध्यंतरी एक तरुण माझ्या रुग्णालयात आला. माझ्यासमोर बसताच तो म्हणाला, ‘‘माझ्या नाकाचे हाड वाढले आहे. यापूर्वी ४ वेळा मी त्यावर शस्त्रकर्म करून घेतले आहे, तरीही ते परत परत वाढते. आता मला शस्त्रकर्म करायचाही कंटाळा आला आहे. तुम्ही काही करू शकता का ? आणि खात्रीचे असेल, तरच उपचार चालू करा. उगाच पैसा आणि वेळ यांचा अपव्यय नको.’’ (म्हणजे ४ वेळा शस्त्रकर्म करून काही लाभ झाला असो अथवा नसो; पण त्या चारही वेळा ‘गॅरंटी’ (खात्री) मागितली नव्हती, ती या वेळी येथे प्रथमच मागण्याएवढे धैर्य त्याच्यामध्ये वाढले !)

त्यावर मी म्हणाले, ‘‘मी या आसंदीवर उद्या असेन, याचीही निश्चिती देता येत नाही. जोपर्यंत असेन, तोपर्यंत प्रयत्न करू.’’ ‘‘ते प्रयत्न वगैरे नको, निश्चितीने बरे होणार आहे का ?’’, तो तरुण अन्य कुणावर तरी असलेली अप्रसन्नता माझ्यावर काढत होता. मी त्याला म्हणाले की, आधी मला तुम्हाला तपासून तुमचा आजार औषधाने बरा होणारा आहे कि नाही ? ते ठरवू दे. बाकी पुढचे सगळे तुमच्यावर अवलंबून आहे. आम्ही ग्रंथात सांगितलेले उपचारच प्रत्येक रुग्णाला सांगतो. ते उपचार आणि पथ्यपालन रुग्ण किती प्रामाणिकपणे करतो, यावर उपचारांचे यशापयश अवलंबून असते. अशा रितीने सांगितल्यावर तो जरा नरमला. त्यानंतर तपासून झाल्यावर मी त्याला योग्य ते उपचार सांगितले.

१. नाकाच्या आजारावर सतत शस्त्रकर्म करण्यापेक्षा मुळावर घाव घालणे आवश्यक !

नाकाचे हाड वाढणे (यात दोन नाकपुड्यांच्या मध्ये असलेला हाडाचा नरम पडदा एका बाजूला सुजतो), ‘सायनसायटीस’ (मानवी कवटीत दोन्ही भुवयांच्या वर आणि दोन्ही गालांच्या हाडांवर अशा ४ पोकळ्या असतात. यांना ‘सायनस’ म्हणतात. ‘सायनसायटीस’ आजारात या पोकळ्यांमधे कफ किंवा पू असे स्राव किंवा बुरशीसारखे घटक जमा होतात.) आणि ‘नोजल पॉलीप’ (नाकाच्या पोकळीत वाढणारा मांसाचा अंकुर) हे आजार आजकाल मोठ्या प्रमाणावर आढळतात. ‘शस्त्रकर्म’ हा त्या तिन्हीवरील निश्चितीपूर्वक उपाय आहे आणि लोक तो करूनही घेतात; परंतु हा आजार परत परत होत रहातो. हे म्हणजे नाक कापून अवलक्षण केल्यासारखे होते. याचे कारण नाकाच्या रचनेमध्ये विकृती निर्माण करणार्या सर्दीच्या मुळावर घाव घातला जात नाही.

२. सर्दी होण्यामागील कारणे

प्रदूषण हे आजच्या शहरांमधील सर्दीचे मुख्य कारण आहे. ते टाळता येणे शक्य नसले, तरी त्याचा काहीतरी प्रतिकार करायला हवा ना ? तो करता येतो. सर्दी होण्याची आणि ती टिकण्याची अनेक कारणे आहेत.

अ. शहरामध्ये लहानपणापासून वातानुकूलित खोली आणि बाहेरील हवामान यांत आलटून पालटून जात राहिल्याने घसा अन् नाक यांतील आतील त्वचेला कसे वागावे ? हे कळत नाही. त्यातून सतत स्राव होत रहातात.

आ. रात्री झोपतांना गार पाणी पिण्याची सवय असल्यास सर्दी, कफ आणि त्यातून होणारे आजार बळावतात.

इ. कलिंगड, खरबूज, अननस, केळी अशी फळे किंवा फळांचे रस भरपूर प्रमाणात घेत राहिल्याने शरिरात कफाचे आजार मूळ धरून रहातात.

ई. दूध, दही, ताक आणि मिल्क शेक हे पदार्थही कफाचे स्राव वाढवणारे आहेत.

उ. आईस्क्रीम, चॉकलेटस्, केक, पेस्ट्री, कॅडबरी असे गोड पदार्थ शरिरात विकृत कफाच्या निर्मितीला कारणीभूत ठरतात.

ऊ. दुपारी जेवण झाल्यावर झोप घेतल्याने शरिरातील कफ वाढतो.

ए. डोसा, इडली आणि उत्तपा हे आंबवलेले पदार्थ वारंवार अन् भरपूर प्रमाणात खात राहिले, तरी सर्दी होत रहाते. दाक्षिणात्य हवामानात हे पदार्थ चालत असले, तरी मुंबई आणि कोकण या पट्ट्यात ते त्रासदायक ठरतात.

ऐ. नवीन धान्य आणि कुकरमध्ये शिजवलेला भात यांचाही कफाच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा असतो.

सर्दीची ही कारणे जोपर्यंत दूर केली जात नाहीत, तोपर्यंत ती अल्प न होता नाकाच्या गंभीर आजारांचा पाया शरिरात रचत रहाते. अर्वाचीन शास्त्राच्या मते विषाणू, जिवाणू (बॅक्टेरिया), बुरशी अशा कुणाच्याही आक्रमणामुळे सर्दी होते. शरिराचे बळ अल्प पडले, तर ती टिकते आणि पुढच्या व्याधी निर्माण होऊ शकतात.

३. सायनसायटीसची लक्षणे

‘सायनसायटीस’मध्ये सर्दी, कणकण, नाक चोंदणे यासमवेतच डोकेदुखी हे मुख्य लक्षण असते. या वेदना विशेषतः भुवयांच्या वरील भागात आणि गालावर असतात. खाली वाकल्यावर वेदना वाढतात. वाफ घेतल्यावर त्या अल्प होतात. ‘सायनस’ असलेल्या या जागांना सूज आलेली दिसते. या लक्षणांवरून आजाराचे निदान सहजपणे होऊ शकते.

नाकाचे हाड वाढले असेल किंवा नाकात मासांकुर वाढला असेल, तर संबंधित नाकपुडी बंद होऊन श्वास घ्यायला अडथळा निर्माण होतो. विजेरीच्या प्रकाशात नाक तपासल्यास या दोन्ही गोष्टी डोळ्यांना स्पष्ट दिसतात. त्यासाठी फार क्लिष्ट तपासण्या करण्याची आवश्यकता नसते. हे आजार अधिक दिवस अंगावर काढले, तर श्वास न्यून पडत गेल्याने त्यामुळे अनुत्साह, आळस, ग्लानी, अंगदुखी, एकाग्रतेचा अभाव अशा दैनंदिन जीवनात अडथळा आणणार्याय लक्षणांची भर पडत जाते.

४. नाकाच्या आजारांची चिकित्सा

अ. आयुर्वेदाच्या मते आजाराची कारणे दूर करणे, हा कोणत्याही आजाराच्या चिकित्सेतील पहिला टप्पा असतो. अल्प औषधात आजार लवकर बरा व्हावा, असे वाटत असेल, तर पथ्यपालन हे आवश्यक आहे. गोड, आंबट, खारट, गार, दुधाचे पदार्थ, कच्चे सलाड (टोमॅटो, काकडी इत्यादींची कोशिंबीर), पनीर, फलाहार आदी सगळे पदार्थ वर्ज्य करायला हवेत. याउलट गरम आणि ताजा आहार, आहारात मसाल्यांचा समावेश आणि सूर्यास्तापूर्वी जेवण हे नियम पाळायला हवेत. क्वचित् गोड पदार्थ खायचाच असेल, तर तो जेवणानंतर न खाता जेवणाच्या पूर्वी खावा. फळे फारच आवडत असतील, तर रसदार फळांच्या ऐवजी गर असलेली फळे खावीत, तीही सकाळी, संध्याकाळी किंवा जेवणानंतर न खाता दुपारच्या जेवणात खावीत. अर्थात् जिभेला अशी सवलत दिली की, औषधे आणि त्यांचा कालावधी वाढणार, याची सिद्धता ठेवावी.

आ. अगदी पाश्चात्त्य वैद्यकशास्त्रानुसारही नाकाच्या आजारांवर शस्त्रकर्म हा शेवटचा उपाय आहे. म्हणूनच शस्त्रकर्म करून नाक कापून घेण्यापूर्वी आयुर्वेदातील उपायांचा निश्चित विचार करावा. कुठला तरी लेख आणि पुस्तक वाचून आपल्या मनाने औषध चालू करू नये. जवळचा वैद्य गाठावा आणि त्याचा सल्ला मानावा.

इ. या तिन्ही विकारात आयुर्वेदातील ‘नस्य’ कर्म (नाकात औषधी तेल किंवा तूप अथवा काढा किंवा चूर्ण घालणे) फार उपयोगी ठरते. किंबहुना नस्य हा नाकाच्या आजारातील प्रधान उपक्रम आहे. आजार आणि रुग्णाच्या आवश्यकतेनुसार नस्याचे औषध अन् त्याचे प्रमाण हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असू शकते. त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याप्रमाणेच ते करत रहावे. त्यात टाळाटाळ आणि कंटाळा अजिबात करू नये. थोडे बरे वाटल्यावर मनाने ते बंद करू नये. वैद्य सांगतील तोपर्यंत चालू ठेवावे.

ई. यासमवेतच वाफ घेणे, निलगिरीचा रुमाल जवळ ठेऊन त्याचा वास घेत रहाणे, बाहेर जातांना नाकावर रुमाल बांधून जाणे, कपाळ आणि गाल यांवर सकाळी किंवा रात्री सुंठ अथवा वेखंडाचा लेप लावणे, अधूनमधून उष्ण पाणी पिणे, हे उपाय आरामदायी ठरतात.

उ. कपालभाती, भस्त्रिका आणि सूर्यभेदन यांचा नियमित सराव केल्यास नाक अन् पोकळ्या यांमधील कफ पातळ होऊन बाहेर पडायला साहाय्य होते. त्याचे प्रमाण वैद्यांकडून ठरवून घ्यावे. अतिरेक टाळावा. योगाभ्यासातील ‘जलनेती’ हेही नाकाच्या विकारांमध्ये उपयोगी ठरते; मात्र ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी. त्यात चूक झाली, तर कानात पाणी जाऊन नको, ते आजार आयुष्यभरासाठी मागे लागू शकतात.

५. शरिरावरील अलर्जी अल्प करण्यासाठी ध्यानाचा उत्तम उपयोग होणे

हवेचे प्रदूषण करणार्याउ घटकांची ॲलर्जी असेल, तर नाकाचे हे आजार हमखास होतात. (ॲलर्जी म्हणजे एखाद्या गोष्टीला शरिराकडून दिली जाणारी अवाजवी प्रतिक्रिया होय.) ही प्रतिक्रिया अर्थात्च सर्दीच्या स्रावांच्या रूपात असते. ती अल्प करायची असेल, तर ध्यानाचा उत्तम उपयोग होतो. ध्यानामुळे मन शांत होते. मनाच्या प्रतिक्रियांची तीव्रता आणि शीघ्रता अल्प होते. त्याचे परिणाम शरिरावर होऊन शरीरही ॲलर्जीच्या रूपातील त्याच्या प्रतिक्रिया अल्प करते.

नाकाच्या आजारांमध्ये शस्त्रकर्म टाळायचे असेल, तर आयुर्वेदात त्यासाठी योग्य मार्ग आहेत. इंग्रजी नावांना घाबरून ‘आयुर्वेदात याला औषध नसेल’, असे परस्पर ठरवू नये. ग्रंथात त्या आजारांना कदाचित् वेगळे नाव असेल वा नसेलही; परंतु शरिरात झालेल्या पालटांचा अभ्यास करून वैद्य अशा आजारांची चिकित्सा निश्चितपणे करू शकतात.’

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : ‘साप्ताहिक विवेक’, १७ मार्च २०१८)