युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असे सांगितल्याचे प्रकरण  

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी दूरभाषवरून एकमेकांशी संवाद साधला. या वेळी झेलेंस्की यांनी पंतप्रधान मोदी यांचे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असा सल्ला दिल्यावरून आभार मानले.

१. पंतप्रधान कार्यालयाने प्रसृत केलेल्या निवेदनानुसार, मोदी आणि झेलेंस्की यांनी युक्रेनमधील संघर्षावर चर्चा केली. युद्ध आणि तणाव लवकरात लवकर संपवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याची आवश्यकता आहे, असे मोदी यांनी सांगितले.

२. मोदी यांनी पुढे ‘युक्रेन संघर्षावर सैनिकी मार्गाने कोणताही तोडगा निघू शकणार नाही. या संघर्षामुळे युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्प धोक्यात आले आहेत. याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात,’ अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

३. गेल्या मासात शांघाय सहकार्य संघटनेच्या २२ व्या वार्षिक परिषदेच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट झाली होती. त्या वेळी द्विपक्षीय चर्चेत मोदी यांनी युक्रेन युद्धाविषयी चिंता व्यक्त करत ‘ही युद्धाची वेळ नव्हे’, असा पुतिन यांना सल्ला दिला होता. यावर ‘युद्धाविषयीची तुमची (मोदी) चिंता मी समजू शकतो. युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आमचीही इच्छा आहे; मात्र युक्रेनने चर्चेत रस दाखवलेला नाही’, असे पुतिन म्हणाले होते.