पायी हज यात्रेला जाणार्‍या भारतीय मुसलमानाला पाकने त्याच्या देशातून जाण्यास नाकारले !

जगभरात इस्लामच्या नावावर ढोल पिटणारा देश अशा प्रकरणात खोडा घालत आहे ! – पंजाबचे शाही इमाम

पंजाबचे शाही इमाम मौलाना महंमद उस्मान रहमानी लुधियानवी

लुधियाना (पंजाब) – केरळ येथून सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रेसाठी पायी जाणार्‍या शिहाब चित्तूर यांना पाकिस्तान सरकारने त्यांच्या देशातून जाण्यास अनुमती नाकारली आहे. पाकने शिहाब यांना व्हिसा नाकारला आहे. ही माहिती ‘मजलिस अहरार इस्लाम’ या संघटनेच्या मुख्यालयामध्ये पंजाबचे शाही इमाम मौलाना महंमद उस्मान रहमानी लुधियानवी यांनी दिली. सध्या शिहाब चित्तूर पंजाबमध्ये पोचले आहेत.

पाकिस्तानच्या देहलीतील दूतावासाने प्रारंभी शिहाब यांना आश्‍वासन दिले होते की, ते जेव्हा पाकच्या सीमेवर पोचतील, तेव्हा त्यांना पाकचा व्हिसा दिला जाईल; कारण त्यापूर्वीच दिला, तर त्याचा कालावधी संपेल; मात्र आता शिहाब पंजाबला लागून असलेल्या पाकच्या सीमेवर पोचले असतांना पाकने व्हिसा देण्यास नकार दिला आहे.

पाकिस्तानला लाज वाटली पाहिजे ! – मौलाना महंमद उस्मान रहमानी लुधियानवी

मौलाना महंमद उस्मान म्हणाले की, पाकिस्तानी अधिकार्‍यांचे वागणे आश्‍चर्यकारक आहे. धोका देणे ही पाकची जुनी सवय आहे. भारताच्या मुसलमानांनी पाकिस्तान सरकारकडून कधी कोणतीही अपेक्षा केली नाही. ७५ वर्षांमध्ये पहिल्यांदा भारतीय मुसलमान मक्केला पायी जात असतांना पाकने त्याच्या भूमीतून जाण्यास नकार दिला. पाकिस्तान सरकारला लाज वाटली पाहिजे. जगभरात इस्लामच्या नावावर ढोल पिटणारा देश अशा प्रकरणात खोडा घालत आहे. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून साहाय्य करण्याची विनंती केली आहे. यातून संपूर्ण इस्लामी देशांसमोर पाकचा दुटप्पी चेहरा उघड होईल.

संपादकीय भूमिका

भारतातील पाकप्रेमी मुसलमान आता गप्प का ?