मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देऊन युवकाने पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देऊन एका युवकाने पोलिसांची दिशाभूल केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. खोटी माहिती देणार्‍या अविनाश वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली असून अन्वेषणानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.

अविनाश वाघमारे हे मुंबईतील घाटकोपर येथील रहिवासी आहेत. २ ऑक्टोबर या  दिवशी लोणावळा येथील एका उपाहारगृहात ते जेवणासाठी आले होते. तेव्हा त्यांनी मद्यप्राशन केले होते. हॉटेलमध्ये थंड पाणी मिळाले नाही; म्हणून त्यांनी मालकांशी वाद घातला. मालकाला त्रास देण्यासाठी त्यांनी हॉटेलमधून १०० क्रमांकावर दूरभाष करून मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याचे सांगितले. अविनाश यांच्या पत्नीने ते मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगितले आहे. २ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा दूरभाष आल्यावर पोलिसांकडून याविषयी अन्वेषण करण्यात केले. अविनाश यांच्या अटकेनंतर यामागील प्रकार उघडकीस आला.